काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
सध्याच्या काळात वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्च आणि डीजेचा मोठा गाजावाजा करण्याची प्रथा वाढत असताना, त्याला छेद देत पत्रकार रुपेश डोलारे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपणारा एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. चि. आरुष रुपेश डोलारे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सांगवी मार्डी येथील जि. प. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या साध्या पण अत्यंत अर्थपूर्ण कार्यक्रमात चि. आरुष याने आपल्या मित्र-परिवारासोबत वाढदिवसाचा आनंद लुटण्याऐवजी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे पसंत केले. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रंगपेटी व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
आजकाल वाढदिवसावर केला जाणारा अफाट खर्च टाळून, तोच पैसा जर समाजातील वंचित किंवा ग्रामीण घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला, तर त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो, हा संदेश या उपक्रमातून डोलारे दांपत्याने दिला आहे. या सामाजिक बांधिलकीचे आणि दूरदृष्टीचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
शिक्षणास प्रोत्साहन आणि सामाजिक संस्कार
"सध्याच्या डिजिटल आणि चकाचौंध असणाऱ्या युगात लहान मुलांवर योग्य आणि सामाजिक भान जपणारे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या वाढदिवसासारख्या प्रसंगी अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवल्याने एका बाजूला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळते, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मुलालाही सामाजिक उत्तरदायित्वाचे धडे मिळतात," असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माने मॅडम, कोळेकर सर, चव्हाण सर, गायकवाड सर, सौ. अश्विनी रुपेश डोलारे, ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या व्यवस्थापनाने व शिक्षकांनी डोलारे परिवाराचे आभार मानून चि. आरुष याला भावी आयुष्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा दिल्या.
0 Comments