Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🚆 गणेशोत्सवासाठी कोकणवारी सोपी! नांदेड–सावंतवाडी गणपती स्पेशलला धाराशिवचा अतिरिक्त थांबा; धाराशिवकर प्रवाशांना मोठा दिलासा; १२, १५, १४ आणि १७ सप्टेंबरच्या विशेष फेऱ्यांचा होणार लाभ


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
धाराशिव | उमाजी गायकवाड
 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड दरम्यान धावणाऱ्या गणपती विशेष रेल्वेला धाराशिव स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने घेतला आहे. त्यामुळे धाराशिवसह परिसरातील प्रवाशांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्रमांक ०७६५९ आणि ०७६६०च्या एकूण चार अतिरिक्त गणपती विशेष फेऱ्यांना धाराशिव स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. हा थांबा येडशी आणि बार्शी टाऊन स्थानकांदरम्यान असणार आहे.

१२ आणि १५ सप्टेंबरला नांदेडहून सावंतवाडीकडे
गाडी क्रमांक ०७६५९ नांदेड–सावंतवाडी रोड गणपती स्पेशल १२ आणि १५ सप्टेंबर २०२६ रोजी धावणार आहे. नांदेडहून ही गाडी रात्री ८ वाजता सुटेल. परभणी, परळी वैजनाथ, लातूर मार्गे ती धाराशिव येथे पहाटे ५.०५ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, पनवेल, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी मार्गे ही गाडी सावंतवाडी रोडला पोहोचेल.सावंतवाडी रोड येथे गाडीचे आगमन पहाटे ३.३० वाजता होणार आहे.

१४ आणि १७ सप्टेंबरला सावंतवाडीहून नांदेडकडे
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०७६६० सावंतवाडी रोड–नांदेड गणपती स्पेशल १४ आणि १७ सप्टेंबर रोजी धावणार आहे. सावंतवाडी रोड येथून सकाळी ७.३० वाजता सुटणारी ही गाडी रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, कल्याण, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि बार्शी टाऊन मार्गे धाराशिव येथे मध्यरात्री २.५० वाजता पोहोचेल. त्यानंतर लातूर, परळी वैजनाथ आणि परभणी मार्गे नांदेडला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.

२४ आयसीएफ डब्यांची रचना
या गणपती विशेष रेल्वेला एकूण २४ आयसीएफ डबे असणार आहेत. त्यामध्ये
एसी २ टियर – ३ डबे
एसी ३ टियर – ५ डबे
स्लीपर – १० डबे
जनरल – ४ डबे
दिव्यांगांसाठी एसएलआर – २ डबे
अशी डब्यांची रचना आहे.
रेल्वेच्या निर्णयामुळे धाराशिवकरांना फायदा
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी नांदेड–सावंतवाडी विशेष रेल्वेला धाराशिव येथे अतिरिक्त थांबा मिळाल्याने मराठवाड्यातील, विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील भाविकांना मोठा फायदा होणार आहे. थेट रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध झाल्याने कोकणवारीसाठी प्रवाशांना अधिक सोयीचा मार्ग मिळणार आहे.
रेल्वेने प्रवाशांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी भारतीय रेल्वेची अधिकृत चौकशी सेवा, RailOne किंवा NTES ॲपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

— Only न्युज धाराशिव वृत्तसेवा

Post a Comment

0 Comments