Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

निसर्गाची अवकृपा व प्रशासकीय उदासीनतेचा फटका!पीक वाया गेल्याने हताश बळीराजा; चार एकरांतील सोयाबीनवर थेट फिरवला ट्रॅक्टरतुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील संतापजनक प्रकार; पीक पाहणी सहाय्यकाच्या डोळ्यांदेखत उपटून फेकून दिले पीक

कष्टाचं रान अन् डोळ्यांत पाणी...तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथे हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले. हातात उरलेले करपलेले पीक दाखवत आणि अखेर हताश होऊन चार एकरांतील उभ्या सोयाबीनवर ट्रॅक्टरने रोटर फिरवताना बाधित शेतकरी.

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
 काटी | उमाजी गायकवाड 
निसर्गाची अवकृपा आणि पाऊस गायब झाल्याने ऐन वाढीच्या टप्प्यात वाळत चाललेले पीक डोळ्यांदेखत उध्वस्त होताना पाहण्याची वेळ पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातील बळीराजावर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील शेतकरी महादेव मारुती जाधव व समाधान जाधव यांनी कमालीच्या हताशेतून आपल्या चार एकर शेतातील उभे सोयाबीन ट्रॅक्टरचा रोटर लावून उध्वस्त केले. विशेष म्हणजे, पीक पाहणी सहाय्यक प्रदीप जाधव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

भांडवली खर्च वाया; शेतकरी आर्थिक अरिष्टात
खुंटेवाडी येथील गट नंबर ५ मध्ये जाधव बंधूंनी अत्यंत मेहनतीने चार एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला पावसाची साथ लाभल्याने पीक जोमात आले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दांडी मारल्याने आणि तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे उभे पीक करपून गेले. पेरणी, नांगरणी, खते, बियाणे आणि कोळपणी असा हजारो रुपयांचा भांडवली खर्च करूनही हातात काहीच पडण्याची शक्यता उरली नाही. कर्जबाजारीपणा आणि पुढील आर्थिक संकटाच्या भीतीपोटी शेवटी या शेतकऱ्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले.

प्रशासनाचा संथ कारभार अन् पंचनाम्यांचा खोळंबा
विमा कंपन्यांची दिरंगाई: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असतानाही पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष बांधावर पोहोचण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

तातडीने भरपाईची मागणी: केवळ कागदी घोडे न नाचवता तुळजापूर तालुक्यातील वाळलेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

"उसनवारी करून आणि कर्ज काढून पेरणी केली होती. महिनाभर पाऊस न आल्याने पीक जळून खाक झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतात ट्रॅक्टर फिरवण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उरला नव्हता."
— महादेव मारुती जाधव (बाधित शेतकरी, खुंटेवाडी)

Post a Comment

0 Comments