तुळजापूर | ‘Only न्यूज धाराशिव’ वृत्तसेवा
मराठवाड्याच्या प्रलंबित प्रश्नांवरून आणि शेतकरी-सामान्य जनतेच्या होणाऱ्या पिळवणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. "मराठवाडा विकास - तुमसे ना हो पाएगा!" या आक्रमक घोषणेने आज तुळजापूर तालुका हादरून गेला. महायुती सरकारच्या निष्क्रीय कारभाराचा पंचनामा करत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना १८ प्रमुख मागण्यांचे खणखणीत निवेदन सादर करण्यात आले.
निझामी राजवटीतून मुक्त झाल्यानंतरही मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची संतापजनक वस्तुस्थिती आंदोलकांनी मांडली. "सध्याचे राज्य सरकार केवळ जुमलेबाजी आणि फोल घोषणा करून मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसत आहे," असा घणाघाती आरोप याप्रसंगी करण्यात आला.
शिवसेनेने निवेदनाद्वारे मांडलेले मुख्य मुद्दे आणि मागण्या:
कोरडा दुष्काळ व चारा छावण्या: पावसाअभावी खरीप पिके जळून खाक झाल्याने राज्यात त्वरित ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा.
पाणी टंचाईवर उपाय: अल-निनोच्या भीषण संकटामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे; त्यावर तातडीने उपाययोजना करा.
पाण्याचे आणि विजेचे गाजर: २४ तास आणि मोफत विजेचे आश्वासन हवेतच विरले आहे. मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी, वॉटर ग्रीड आणि सिंदफळ धरणाचे आश्वासन म्हणजे निव्वळ फसवणूक आहे.
शेतकऱ्यांची घोर फसवणूक: ‘सातबारा कोरा’चे आश्वासन पाळले नाही. २०२४-२५ चा पीक विमा जाचक अटींमुळे नाकारला गेला असून, मागील अतिवृष्टीच्या हेक्टरी ३.४७ लाखांच्या मदतीचा पत्ता नाही. खते-बियाण्यांचे भाव वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
योजनांचा बोजवारा व भ्रष्टाचार: 'लाडकी बहीण' योजनेत ई-केवायसीच्या जाचक अटी घालून महिलांना वंचित ठेवले जात आहे. निराधार व दिव्यांगांचे मानधन थकले आहे, तर जल जीवन मिशनमध्ये अब्जावधींचा भ्रष्टाचार झाला आहे.
युवा व गरिबांची पिळवणूक: NEET व MPSC पेपरफुटीने तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. महामार्गांची कामे रखडली असून स्मार्ट मीटरच्या नावाने गरिबांना लुटून उद्योगपतींचे खिसे भरले जात आहेत.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची दमदार उपस्थिती:
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा उपप्रमुख तथा जि. प. सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शामल पवार, जिल्हा समन्वयक शाम पवार, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील, उपतालुकाप्रमुख व खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुनील जाधव, सुधीर कदम, तालुका संघटक कृष्णात मोरे, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले, संजय भोसले, ॲड. रामचंद्र ढवळे, प्रदीप जोशी, अर्जुन आप्पा साळुंखे, बापू नाईकवाडी, दगडू नाना शिंदे, दत्ता भोसले, राजेंद्र जाधव (मेजर), अनिल छत्रे, चेतन बंडगर, सागर इंगळे, शिवानंद बिडवे, बालाजी पांचाळ, अशोक घोडके, अमोल घोटकर, डोंगरे, कारभारी यांच्यासह शेकडो शिवसैनिक व नागरिकांनी केले.
0 Comments