तुळजापूर | 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर येथील 'राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब'ने आपल्या रौप्य महोत्सवी वाटचालीत क्रीडा जोपासनेसोबतच सामाजिक दायित्वाचा एक वस्तुपाठ घालून दिला आहे. सदस्यांच्या वाढदिवसावरील अनावश्यक आणि चकचकीत खर्च पूर्णपणे टाळून, तोच पैसा समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा ठाम निर्धार क्लबने केला आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भातंब्री येथील प्रत्येक विद्यार्थ्याला पाच वह्यांचे वाटप करून शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून तुळजापूर व परिसरात क्रीडा संस्कृती रुजणाऱ्या या क्लबने केवळ मैदानापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधीलकी जपण्याचा संकल्प केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने फिजूलखर्च न करता वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळांना वाचनालयाची पुस्तके भेट देणे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन असे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच उपक्रमांतर्गत भातंब्री येथील जि. प. शाळेची निवड करून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ही शैक्षणिक भेट स्वीकारताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
शिक्षिका मनीषा क्षीरसागर यांच्याकडून 'गोष्ट माईची' पुस्तकाची भेट
शाळेच्या वतीने क्लबच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती मनीषा महादेव क्षीरसागर यांनी स्वतः लिहिलेले ‘गोष्ट माईची’ हे पुस्तक क्लबच्या सदस्यांना सप्रेम भेट देऊन त्यांच्या या सामाजिक जाणिवांचा गौरव केला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष विपिन शिंदे, भातंब्रीचे उपसरपंच गुणवंत बंडगर, क्लबचे सदस्य सचिन शिंदे, नितीन सूर्यवंशी, सुरज चौगुले, महेश पुजारी, प्रणव मलबा, ऋषिकेश साळुंखे, समाधान बंडगर, पांडुरंग कांबळे, दत्ता देवकुते तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके, सहशिक्षिका मनीषा क्षीरसागर व लिंबाबाई बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके यांनी क्लबच्या २५ वर्षांच्या क्रीडा प्रवासाचा आणि या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचा गौरव केला. वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे हा समाजासाठी एक दिशादर्शक वस्तुपाठ आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने क्लबच्या सदस्यांचे आभार मानण्यात आले.
0 Comments