Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डीजे, लेझरवर बंदी घाला; तुळजापूर शहरवासीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) आणि 'महाराष्ट्र पोलिस कायद्या'न्वये कठोर कारवाईची मागणी; ध्वनिप्रदूषण व प्रकाशप्रदूषण रोखण्याचे प्रशासनाला आवाहन

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डि.जे. (DJ) आणि तीव्र लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार मागणी तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून ध्वनी व प्रकाशप्रदूषण करणाऱ्यांवर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) व 'महाराष्ट्र पोलिस कायद्या'नुसार थेट गुन्हे दाखल करण्याची विनंतीही नागरिकांनी केली आहे.

सध्या आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि विविध राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्यांसह सणासुदीचा काळ सुरू होत आहे. या काळात निघणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि तीव्र लेझर किरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना या ध्वनी व प्रकाशप्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

...अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करा!
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता अथवा नियमांचे उल्लंघन करून डीजे व लेझरचा वापर करणाऱ्यांवर खालील कायदेशीर कलमांनुसार कारवाई करण्यात यावी:

भारतीय न्याय संहिता (BNS) – कलम २७० व २९२ (पूर्वीचे IPC २६८ व २९०): सार्वजनिक शांतता भंग करणे, उपद्रव (Public Nuisance) निर्माण करणे आणि लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई.

महाराष्ट्र पोलिस कायदा, १९५१ (कलम ३३, ३६ व ३८): ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, विनापरवानगी डीजे वाजवणाऱ्यांवर बंदी घालणे आणि त्यांचे साहित्य/साधने जप्त करण्याचे कायदेशीर अधिकार पोलिसांना आहेत.

शहर आणि परिसरात कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण व प्रकाशप्रदूषण होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विविध संघटना व नागरिकांचे सहकार्य
हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतपणे सादर करण्यात आले असून, या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी (तुळजापूर), तहसीलदार (तुळजापूर) आणि पोलिस निरीक्षक (तुळजापूर) यांनाही माहिती व पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

यावेळी उत्तम शंकरराव अमृतराव, कल्याण रावजी भोसले, बाळासाहेब सेणराव भुतवर, अशोकराव देविदास म्हाळुंगे, मारुती नाईकवाडी यांच्यासह तुळजापूर क्षेत्रातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments