'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
बदलत्या काळात ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य दिशा आणि परिश्रमाची जोड मिळाली, तर ती जागतिक पातळीवर चमकू शकते, याचाच प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे आला आहे. सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेची माजी विद्यार्थिनी स्नेहल रेखा नागनाथ शिंदे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 'एमबीबीएस' (MBBS) पदवी संपादन केली आहे. विशेष म्हणजे, स्नेहलचा थोरला भाऊ सचिन हा देखील डॉक्टर असून, एकाच शेतकरी कुटुंबातील दोन्ही अपत्याने वैद्यकीय क्षेत्रात मारलेली ही गरुडझेप संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीवर शिक्षणाचा 'झाशी पॅटर्न'
डॉ. स्नेहल शिंदे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावरगावच्या जिल्हा परिषद प्रशालेत झाले. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असतानाही केवळ जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारे ठरेल, असा विश्वास शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.
शेतकरी पित्याची अपार मेहनत आणि दोन्ही मुलांचे यश
डॉ. स्नेहल आणि डॉ. सचिन यांचे वडील नागनाथ शिंदे हे सावरगाव येथे कोरडवाहू व थोडीबहुत बागायती शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. स्वतः अत्यंत साध्या आणि कष्टकरी पार्श्वभूमीत असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. त्यांच्या या कष्टाचे चीज करत थोरला मुलगा डॉ. सचिन रेखा नागनाथ शिंदे हा २०२३ मध्येच एमबीबीएस झाला असून, सध्या तो नागपूर येथील नामांकित 'इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय' (IGGMC) येथे एमडी (MD) चे उच्च शिक्षण घेत असून वैद्यकीय सराव (प्रॅक्टिस) करत आहे. आता भावाच्या पावलावर पाऊल ठेवत बहीण स्नेहलनेही डॉक्टर बनून वडिलांच्या कष्टाचे सोने केले आहे. एकाच शेतकरी कुटुंबातील दोन्ही मुले सर्वोच्च वैद्यकीय पदवीधारक झाल्याने शिंदे परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
डॉ. स्नेहल यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, काटी व सावरगाव परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याची दोन्ही लेकरं आज डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज झाल्याबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
"जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तेची खाण असते, हे स्नेहलने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी जर ठरवले, तर त्या कोणत्याही क्षेत्रात अव्वल येऊ शकतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे." > — शिक्षकवृंद व ग्रामस्थ, सावरगाव.
0 Comments