तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या तुळजापूर शहरातील दीपक चौक (भवानी रोड) येथे प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या नियोजित गेटच्या उभारणीला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे गेट झाल्यास परिसरातील शेकडो नागरिकांची कोंडी होणार असून, प्रशासनाने हा निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा स्थानिक रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भात तुळजापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाहीर निवेदन सादर करण्यात आले आहे.
दीपक चौक, जवाहर गल्ली आणि आर्य चौक या भागातील शेकडो नागरिकांची दैनंदिन ये-जा याच मुख्य रस्त्यावरून होत असते. मात्र, प्रशासनाकडून या ठिकाणी गेट बसवण्याची तयारी सुरू असल्याचे काल नागरिकांच्या निदर्शनास आले. या अनपेक्षित निर्णयामुळे स्थानिक परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आणीबाणीच्या प्रसंगी दुर्घटना घडण्याची भीती
नागरिकांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, या मुख्य मार्गावर गेट उभारल्यास स्थानिक रहिवासी, महिला, वृद्ध आणि शाळकरी मुलांचे हाल होणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भविष्यात परिसरात एखादी वैद्यकीय आणीबाणी किंवा आगीसारखी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) अथवा अग्निशामक दलाच्या गाड्यांना आत येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. प्रशासनाच्या या अडवणुकीच्या धोरणामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची राहील, असा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे.
व्यापार ठप्प होऊन उपासमारीची वेळ
तुळजापूर हे अलोट गर्दीचे तीर्थक्षेत्र असल्याने स्थानिक रहिवाशांची उपजीविका प्रामुख्याने येथे येणाऱ्या भाविकांवर आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर अवलंबून आहे. हा रस्ता अडवला गेल्यास ग्राहक दुकानांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. परिणामी, व्यापाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न पूर्णपणे ठप्प होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमुख नेत्यांसह शेकडो नागरिकांचे जाहीर समर्थन
या जनआंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज आप्पासाहेब पाटील, नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, रणजीत चंद्रकांत इंगळे, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय परमेश्वर यांच्यासह गणेश सुरेशराव अनभुले, महेश शिंदे, गणेश रंगाळे आणि शेकडो स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
"प्रशासनाने नागरिकांच्या सुलभ दळणवळणाचा विचार करून हा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा तुळजापूरकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन आणि उपोषण करतील." > — स्थानिक नागरिक व व्यापारी, तुळजापूर.
0 Comments