"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. कुणी नवस पूर्ण झाल्यामुळे तर कुणी अपार श्रद्धेपोटी देवीच्या चरणी नतमस्तक होतो. अशीच एक भक्तीची अनुभूती आज तुळजापुरात दिसून आली. नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आपल्या कुटुंबीयांसह येऊन मातेच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची सुबक मूर्ती अर्पण केली.

​सचिन खिल्लारे हे आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. आई भवानीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून एक किलो वजनाची चांदीची श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती मंदिर संस्थानकडे सुपूर्द केली.

​या भक्तिमय प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविक सचिन खिल्लारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे विकास वाणी, मनोज कदम यांच्यासह संस्थानचे कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खिल्लारे यांच्या या दातृत्वाबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.