Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दुर्गराज रायगडाचे संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही -संभाजीराजे छत्रपती; किल्ले रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; मंत्रिमंडळाची बैठक रायगडावर घेण्याची मागणी; दुर्गराज रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न; गगनभेदी शिवगर्जनांनी अवघा रायगड शिवमय!रायगडावरील गडदेवता शिरकाई देवीला साडी-चोळी व कवड्याची माळ घालण्याचा तुळजापूरला बहुमान; सोहळ्यानंतर शिवभक्तांनी लुटला कोकण अन् महाबळेश्वरच्या निसर्गाचा आनंद

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे छत्रपती 

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
महाड /धाराशिव | उमाजी गायकवाड 
 "कुणाला मी हवा असेन किंवा नको असेन, कितीही अडचणी आल्या तरी मी रायगड संवर्धनाच्या कामातून मागे हटणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या पवित्र कार्याशी कटिबद्ध असेन. दुर्गराज रायगडाचे संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय मी रायगड सोडणार नाही," अशी ठाम आणि महत्त्वपूर्ण ग्वाही स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. किल्ले रायगडावर आयोजित ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक किल्ले रायगडावर घेण्यात यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी शासनाकडे केली.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा लाखो शिवभक्तांच्या अथांग उपस्थितीत, अभूतपूर्व जल्लोषात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.

भगव्या ध्वजाचे आरोहण आणि सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
शनिवारी पहाटे युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडावर भव्य भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेवर पारंपारिक वेदोक्त मंत्रोच्चारात राज्याभिषेकाचे विधी पार पडले. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. या मंगलमय प्रसंगी लाखो शिवभक्तांनी दिलेल्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि शिवगर्जनांच्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दणाणून गेला होता.

आरोपांचा खरपूस समाचार; ६०६ कोटींच्या निधीचा उल्लेख
आपल्या मार्गदर्शनात संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड विकास प्राधिकरणावरून होत असलेल्या राजकीय आरोपांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर निमंत्रित केले होते. त्यावेळी रायगडच्या जतन आणि संवर्धनासाठी 'रायगड विकास प्राधिकरण' स्थापन व्हावे, ही मागणी आपण लावून धरली आणि ती मान्य करून घेतली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

गेल्या १० ते १२ वर्षांत गडावर संवर्धनाची अनेक महत्त्वाची कामे झाली असून, नातेखिंड ते रायगड महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या जाचक नियमांमुळे कामात अनेक मर्यादा येत असल्या, तरीही आम्ही ही कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

"मी प्राधिकरणाचा अध्यक्ष राहावे किंवा नाही, मी हटणार नाही"
निधीच्या वितरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, संवर्धनासाठी येणारा निधी थेट प्राधिकरणाकडे येत नसून, तो काम करणाऱ्या संबंधित विभागांकडे वर्ग केला जातो. "रायगड विकास प्राधिकरण माझ्या प्रयत्नांमुळे स्थापन झाले आहे. त्यामुळे आता मी त्याचा अध्यक्ष राहावे की राहू नये, अशी कोणाचीही इच्छा असली तरी मी बाजूला होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा वारसदार म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी रायगड संवर्धनाच्या कामासाठी कटिबद्ध राहीन," अशा करारी शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले.

माझा राजा छत्रपती...", "जय भवानी, जय शिवाजी..." आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय..." अशा अंगावर शहारे आणणाऱ्या गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि देश-विदेशातून आलेल्या लाखो शिवभक्तांची ऐतिहासिक गर्दी... अशा अभूतपूर्व, शिवमय आणि अत्यंत भारावलेल्या वातावरणात हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी अत्यंत दिमाखात आणि ऐतिहासिक वैभवात संपन्न झाला. या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुळजापूरकरांनी गडावर हजेरी लावली होती.

तुळजापूरच्या पथकाला शिरकाई देवीच्या पूजेचा ऐतिहासिक मान
यावर्षीच्या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य सतीश खोपडे सर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथील विशेष पथक दुर्गराज रायगडावर दाखल झाले होते. किल्ले रायगडाची प्रमुख गडदेवता असलेल्या श्री शिरकाई देवीला आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले साडी-चोळी, कुंकू आणि कवड्याची माळ अर्पण करण्याचा सर्वोच्च मान या पथकाला मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचा अत्यंत लाडका अलंकार म्हणजे 'कवड्याची माळ'. शिवराय स्वतः ही माळ परिधान करत असत. रायगडची रक्षणकर्ती असलेल्या शिरकाई देवीला तुळजाभवानीच्या आशीर्वादाचे हे साहित्य अर्पण करण्याची ऐतिहासिक परंपरा येथे मनोभावे जपण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्याकडे हे पवित्र साहित्य सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर छत्रपतींच्या हस्ते शिरकाई देवीचे विधीवत पूजन करण्यात आले.

या अलौकिक प्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य आमचे सर्वांचे मार्गदर्शक सतिश खोपडे सर, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य महेश गवळी, जीवन इंगळे, 'Only न्युज धाराशिव'चे मुख्य संपादक तथा पुजारी नगर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष उमाजी गायकवाड, कार्याध्यक्ष श्रावण मामा पवार, राहुल जाधव, शिशीर खोपडे, मयुर पारवे,मल्लेश विभुते, शिवशंकर म्हमाने, सत्यजित साठे,शशिकांत रोडे,बापू नाईकवाडी,यांच्यासह लाखो शिवभक्त उपस्थित होते. 'याची देही याची डोळा' हा अभूतपूर्व सोहळा अनुभवताना सर्व तुळजापूरवासीयांचे डोळे भारावून गेले होते.

युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण; राजसदरेवर अवतरला शिवकाळ
सोहळ्याची सुरुवात पहाटे ७ वाजता नगारखाना येथे पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे आणि शाही विधींनी झाली. छत्रपती संभाजीराजे,युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते भव्य भगव्या ध्वजाचे पूजन करून शाही ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता शिवरायांच्या उत्सवमूर्तीची भव्य पालखी राजसदरेवर दाखल झाली. पारंपरिक वेशभूषेतील मावळे, लेझीम पथके आणि कोकणातील प्रसिद्ध 'खालुबाजा' व 'शासनकाठी' यांच्या जल्लोषाने गडावर जणू शिवकाळच पुन्हा जिवंत केला होता.

सुवर्णाभिषेक आणि राजसदरची फुलांची सजावट
सकाळी १० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राजसदरेवरील मेघडंबरीत विराजमान महाराजांच्या उत्सवमूर्तीला पवित्र नद्यांचे जल आणि सुवर्णमुद्रांनी मुख्य सुवर्णाभिषेक घालण्यात आला. विविधरंगी फुलांनी सजलेली मेघडंबरी, फडफडणारे भगवे ध्वज आणि पताकांनी रायगडाचे रूप देखणे बनवले होते. राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक काढून आणि शिवसमाधीला अभिवादन करून मुख्य सोहळ्याची सांगता झाली. ५ आणि ६ जून रोजी गडावर आणि पायथ्याशी शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. सुमारे १४३५ पायऱ्या चढून तसेच रोपवेच्या साहाय्याने लाखो मावळ्यांनी गडावरील महादरवाजा, गंगासागर तलाव, टकमक टोक आणि हिरकणी बुरूज या ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेतले.

हरिहरेश्वर समुद्रकिनारा आणि महाबळेश्वरच्या घाटवाटांचा मनमुराद आनंद
शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर तुळजापूरच्या या पथकाने आपला मोर्चा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांकडे वळवला. सर्वांनी सर्वप्रथम 'दक्षिणकाशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्षेत्र हरिहरेश्वर येथे जाऊन श्री हरिहरेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शन आटोपल्यानंतर मंदिराला लागूनच असलेल्या निसर्गरम्य, अथांग समुद्रकिनाऱ्यावर शिवभक्तांनी समुद्राच्या लाटांवर मनमुराद आनंद लुटला.

कोकणचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासात हे पथक प्रतापगडाच्या पायथ्यापासून महाबळेश्वर मार्गे मार्गस्थ झाले. यावेळी महाबळेश्वरच्या डोंगरदऱ्यांमधील अत्यंत कठीण, वळणावळणाचे आंबेनळी घाट हा ४० किलोमीटरचा आणि परिसरातील थंड व आल्हाददायक निसर्गरम्य वातावरणाचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. रायगडावरील भक्तीचा जागर, कोकणचा समुद्रकिनारा आणि महाबळेश्वरच्या डोंगरदऱ्यांमधील निसर्गाचा हा त्रिवेणी संगम आम्हा सर्व शिवभक्तांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे.

.                          हरिहरेश्ववर दर्शन 

Post a Comment

0 Comments