Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यमगरवाडीच्या एकलव्य संकुलात 'वंचितांचे सोबती' विवेक अयाचित यांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा; यमगरवाडी प्रकल्पाला मदतीचा हात अन् विद्यार्थ्यांशी संवाद;वंचितांच्या उन्नतीसाठी समर्पित व्यक्तिमत्त्वाचा यमगरवाडीत यथोचित सन्मान

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्त्व, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह मा. विवेक किसनराव अयाचित यांचा वाढदिवस तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ-यमगरवाडी येथील 'एकलव्य विद्या संकुलात' अत्यंत उत्साहात आणि माणुसकीच्या ओलाव्याने साजरा करण्यात आला.

गुरूवार, दिनांक २३ जुलै रोजी आयोजित या स्नेहसोहळ्यात, समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या विवेक अयाचित यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थिनींनी आणि संगीता पाचंगे, प्रणिता शेटकार, निर्मला हुग्गे यांनी विवेक अयाचित यांचे भारतीय संस्कृतीनुसार औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या निमिताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अयाचित यांच्या कार्याचा गौरव केला. कोंडीबा देवकर, अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संगीता पाचंगे, माधव पाटील, फुलाजी ताटी कुंडलवार, शिनू कलमुळे, आणि प्रतीक्षा सुपालकर यांनी आपल्या मनोगतातून अयाचित यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. तर, यशवंत निंबाळकर आणि अण्णासाहेब मगर यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरणात राष्ट्रीय एकात्मतेचा रंग भरला.

वाढदिवसाचे औचित्य साधून, विवेक अयाचित आणि त्यांच्या परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडी या प्रकल्पाच्या कार्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अयाचित परिवाराच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

आपल्या सत्कारातून व्यक्त झालेल्या भावनांबद्दल आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल विवेक अयाचित यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी एकलव्य विद्या संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अण्णासाहेब मगर यांनी केले. या स्नेहसोहळ्याला विवेक अयाचित यांच्या सहचारिणी सौ. सीमा अयाचित, सुपुत्र मकरंद अयाचित, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments