'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
'ॲनिमिया मुक्त भारत' अभियानांतर्गत काटी (ता. तुळजापूर) येथील 'आयुष्मान आरोग्य मंदिरा'च्या वतीने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात एक आदर्श वस्तुपाठ घालून देण्यात आला आहे. अवघ्या १० दिवसांच्या अल्प कालावधीत तब्बल ४०० हून अधिक किशोरवयीन मुली, गरोदर माता तसेच शाळाबाह्य किशोरींची हिमोग्लोबिन तपासणी अतिशय नियोजनबद्धरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथजी माशेलकर फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक हिमोग्लोबिन तपासणी उपकरणाच्या साह्याने ही व्यापक मोहीम यशस्वीरीत्या फत्ते करण्यात आली.
विविध शाळा अन् आश्रमशाळांमध्ये धडक मोहीम
या अभियानांतर्गत परिसरातील जिल्हा परिषद प्रशाला (काटी), येडेश्वरी कन्या प्रशाला, भवानी ग्रामविकास विद्यालय, सोनबा येवले आश्रमशाळा आणि नरसिंगरावजी देशमुख आश्रमशाळा येथील विद्यार्थिनींसह गावातील गरोदर माता व शाळाबाह्य किशोरवयीन मुलींची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर सर्व पात्र लाभार्थींना वयोगटानुसार 'आयएफए' (रक्तवर्धक) गोळ्यांचे तत्परतेने वाटप करण्यात आले.
गंभीर रक्तक्षयग्रस्तांवर तातडीने उपचार
तपासणीदरम्यान ज्या लाभार्थ्यांमध्ये रक्तक्षयाची (ॲनिमिया) लक्षणे आढळली, त्यांना रक्तवर्धक, जंतनाशक आणि व्हिटॅमिन-सी च्या गोळ्या वितरीत करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान गंभीर स्वरूपाचा रक्तक्षय (Severe Anemia) आढळलेल्या एका रुग्णाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तेथे संबंधित रुग्णावर 'आयर्न सुक्रोज'चे इंजेक्शन देऊन एका महिन्याचा विशेष रक्तवर्धक उपचार सुरू करण्यात आला आहे.
जि. प. अध्यक्षांकडून व्हिडिओ कॉलद्वारे कौतुक
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. अर्चनाताई पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले यांच्या माध्यमातून थेट व्हिडिओ कॉलद्वारे आरोग्य पथकाशी संवाद साधला. या आरोग्यदायी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत त्यांनी अभियानास शुभेच्छा दिल्या. प्रसंगी जि. प. सदस्य बाळासाहेब भाले, उपसरपंच संपत पंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश देशमुख यांनी उपस्थित राहून प्रातिनिधिक मार्गदर्शन केले.
वृक्षारोपण अन् ठिबक सिंचनाची सामाजिक बांधिलकी
याच औचित्यावर आरोग्य मंदिराच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. संपत पंखे यांनी लावण्यात आलेल्या सर्व वृक्षांच्या संवर्धनासाठी स्वखर्चाने 'ठिबक सिंचन' व्यवस्था उभारून दिली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल आरोग्य मंदिराच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच नवरुजू आरोग्य सेवक अमोल राऊत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम
हा व्यापक उपक्रम यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित राठोड, आरोग्य सेविका श्रीमती संध्याराणी बदले, आरोग्य सेवक श्री. अमोल राऊत, तसेच आशा सेविका श्रीमती वर्षा बनसोडे, श्रीमती तसलीम बेग, श्रीमती अरुणा थोरबोले, श्रीमती रेखा पांगे, श्रीमती गर्जना पांगे व श्रीमती राधा राऊत यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आयुष्मान आरोग्य मंदिर, काटी हे ॲनिमिया मुक्त भारत अभियान अतिशय प्रभावीपणे राबवत असून समाजातील रक्तक्षयाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सातत्याने जनजागृती, वैद्यकीय तपासणी व मोफत उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहे."
0 Comments