ढोकी / प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम समायोजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल धाराशिव तालुक्यातील आरोग्य विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा तालुका गटप्रवर्तकांच्या वतीने 'सुमनगंध' हे पुस्तक देऊन मंगळवार (दि. १४) रोजी विशेष सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रियंवदा म्हाडदळकर यांनी शासकीय समारंभांमध्ये पुष्पगुच्छ किंवा बुकेऐवजी 'पुस्तक' देण्याचे काढलेले आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तंतोतंत पाळल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.
नेमकी पार्श्वभूमी काय?
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी २ जुलै २०२६ रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक काढले होते. जिल्हा परिषदेत दरमहा होणारे सेवानिवृत्ती समारंभ, विविध बैठका किंवा विविध कामाच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विविध संघटनांचे शिष्टमंडळ कार्यालयात येतात. अशावेळी स्वागतासाठी किंवा सत्कारासाठी अनावश्यक खर्चिक पुष्पगुच्छ (बुके) न वापरता, त्याऐवजी 'पुस्तक' भेट देऊन सन्मान करावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले होते. याच आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवारी आरोग्य विभागातील गटप्रवर्तक व कर्मचाऱ्यांनी केली.
तटाळे, साळुंके आणि माने यांचा सत्कार
शासकीय सेवेत कायम समायोजन करण्याचा निर्णय झाल्याबद्दल तालुक्यातील:
सचिन तटाळे (तालुका आशा समन्वयक)
अमोल साळुंके (तालुका लेखापाल)
संजय माने (तालुका कार्यक्रम सहाय्यक)
या तिघांचा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. आशा कार्यकर्त्या अश्विनी मगर यांचे पती बाळासाहेब मगर यांनी लिखित केलेले 'सुमनगंध' हे पुस्तक भेट देऊन हा आगळावेगळा सत्कार सोहळा पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार समारंभास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद गिरी, डेटा एंट्री ऑपरेटर दीपक जाधव, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम, गटप्रवर्तक अंजली चराटे, कविता धनके, सुवर्णा कदम, शाहीन शेख, कनिष्ठ सहाय्यक विकास आकोसकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक सुनील नाईकवाडी, आरोग्य सहाय्यक सतीश मुळे, सहाय्यक कर्मचारी स्नेहा पेठे, परिचारिका चैताली पवार व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक रेखाताई गुंजकर-कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शाहीन शेख यांनी मानले.
...तर १६ वर्षे राबणाऱ्या गटप्रवर्तकांनाही न्याय मिळायलाच हवा!
"राज्य शासनाने १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, गेली १६ वर्षे माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, जनजागृती तसेच कोविडसारख्या जीवघेण्या संकटात महिन्यातील ३० पैकी २५ दिवस गावोगावी फिरून अहोरात्र आरोग्यसेवा देणाऱ्या गटप्रवर्तकांना आजही कायम सेवेचा हक्क मिळालेला नाही. जर १० वर्षांच्या सेवेचा सन्मान होत असेल, तर १६ वर्षे निष्ठेने आरोग्य सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या गटप्रवर्तकांनाही न्याय मिळायलाच हवा. शासनाने आमच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण सेवेची दखल घेऊन तातडीने कायम सेवेत सामावून घ्यावे, हीच राज्यातील सर्व गटप्रवर्तकांची रास्त अपेक्षा आहे."
— रेखाताई गुंजकर-कदम
(जिल्हाध्यक्षा, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा संघटना, तथा ढोकी प्रा. आ. केंद्र गटप्रवर्तक)
0 Comments