Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावची पालखी सोलापूर जिल्ह्यात; 'तामलवाडी'त मराठवाड्याचा भावुक निरोप! सुरतगावात फुलांच्या पायघड्या आणि भव्य पुष्पवृष्टी; ७०० वारकऱ्यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत

Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
 १७ जुलै:"भेटीन मी तुला जीवा, लागली आस..." या आर्त हाकेने आसमंत भारावून टाकत, विठूरायाच्या दर्शनासाठी शेगावहून पंढरपूरकडे निघालेला श्री संत गजानन महाराज पायी दिंडी सोहळा आज, शुक्रवारी (१७ जुलै) सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. मराठवाड्यातील तामलवाडी येथून या सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला, तेव्हा सीमेवर अतिशय भावुक वातावरणात मराठवाड्याने पालखीला निरोप दिला, तर सोलापूरकरांनी मोठ्या उत्साहात 'माऊलीं'चे स्वागत केले. तुळजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गावागावांत या दिंडीचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, हाती टाळ-मृदंग आणि खांद्यावर मानाची भगवी पताका घेऊन निघालेल्या ७०० वारकऱ्यांच्या शिस्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. सुमारे ५०० किलोमीटरचा खडतर पायी प्रवास करत पंढरीच्या विठुरायाकडे निघालेला हा सोहळा सकाळी ठीक ९ वाजता माळुंब्रा गावच्या शिवारात विसावला.

पोलिस प्रशासनाकडून 'श्रीं'चे पूजन
दिंडीचे सीमाभागात आगमन होताच तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे आणि ईश्वर नांगरे यांनी श्रींच्या पादुकांना पुष्पहार अर्पण केला आणि मनोभावे दर्शन घेऊन सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर सांगवी (मार्डी), माळुंब्रा, सांगवी (काटी), सुरतगाव आणि तामलवाडी येथील गावकऱ्यांनी 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात पालखीचे स्वागत केले.

महामार्गावर ठिकठिकाणी अन्नदान
पालखी सोहळा राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जागोजागी अन्नदान आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी भक्तांनी रस्त्यावरच छोटे-छोटे स्टॉल्स उभारून वारकऱ्यांची सेवा केली.

सुरतगावात अवतरली पंढरी!
दुपारी १२ च्या सुमारास पालखी सोहळा सुरतगाव येथे पोहोचला. या निमित्ताने संपूर्ण गाव सुशोभित करण्यात आले होते. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्यांची आरास, घराघरांच्या वेशीला आंब्याची पाने आणि फुलांची तोरणे बांधण्यात आली होती. सुरतगाव येथे पालखीचा दोन तासांचा दुपारचा विसावा असल्याने परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

वाद्यांच्या गजरात झाली पुष्पवृष्टी
सुरतगावात पालखी दाखल होताच हलगी, ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढोल-ताशांच्या तालावर संपूर्ण दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. विसाव्याच्या ठिकाणी उभारलेल्या भव्य वॉटरप्रूफ मंडपात पालखी विसावली. येथे सतीश कुलकर्णी परिवाराच्या वतीने श्रींच्या मूर्तीची व पादुकांची षोडशोपचार पूजा करण्यात आली. या प्रसंगी दिंडीतील वारकऱ्यांसह परिसरातील सुमारे ४ हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यांचे लाभले मोलाचे योगदान
या भव्य दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आणि वारकऱ्यांच्या अखंड सेवेसाठी गावकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने:
सेवा व अन्नदान: सतीश पांडुरंग कुलकर्णी, दत्तात्रय महादेव नकाते, विठ्ठल गुंड, सुनील नकाते, राम गुंड, राम कोंडीबा गुंड, ग्रामसेवक भीमराव झाडे, माजी उपसरपंच आण्णासाहेब गुंड, विजय देवकर, तानाजी गुंड, उपसरपंच बाबासाहेब गुंड, पवन गुंड, विजय नकाते, गणेश नकाते, नागेश नकाते, अजय नकाते, ब्रह्मानंद काळे, देवानंद काळे, गणेश गुंड, ज्ञानराज गुंड, बापू गुंड, सलीम शेख, मोहन नकाते, रमेश नकाते, महेश नकाते, नागनाथ माळी, आदित्य माळी, वैभव माळी आणि रामहरी गुंड.

आरोग्य सेवा पथक: वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या संगीता चव्हाण, संतोष वांजरे, अलका गुंड, गजेंद्र बोचरे, महेश गुंड, महादेव मगर आणि आप्पासाहेब गुंड यांनी अविरत वैद्यकीय सेवा पुरवली.

जळकोटवाडी येथील सहकार्य: जळकोटवाडी येथून महादेव जगदाळे, केशव पाटील, गणेश जगदाळे, साधू शिंदे, विशाल फंड आदींनी चोख व्यवस्था ठेवत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.

मराठवाड्याचा निरोप घेऊन सोलापूरच्या भूमीत दाखल झालेली ही दिंडी आता विठूरायाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.

Post a Comment

0 Comments