तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय उपसभापती सचिन अहिर यांनी आज (दि. १२ जुलै) सहकुटुंब कुलस्वामिनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मातेच्या चरणी हजेरी लावली. त्यांनी आई तुळजाभवानीचे अत्यंत विधिवत आणि भावपूर्ण दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मातेची आरती करून, राज्यातील जनतेला सुख-समृद्धी, शांतता लाभो आणि राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी साकडे घातले.

प्रशासनाकडून जंगी स्वागत आणि सत्कार
उपसभापती सचिन अहिर हे मंदिरात पोहोचताच, धाराशिवचे उपविभागीय अधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. ओंकार देशमुख आणि तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. विनोद गंगणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. दर्शन झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना श्रीदेवीजींची पवित्र प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विकासकामांची घेतली माहिती
दर्शन आटोपल्यानंतर उपसभापती अहिर यांनी मंदिर प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध अत्याधुनिक सुविधा आणि मंदिर परिसरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

या मंगल प्रसंगी तुळजापूरचे पुजारी बांधव, स्थानिक पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसभापतींच्या या दौऱ्यामुळे मंदिर परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.