तुळजापूर | Only न्यूज धाराशिव वृत्तसेवा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी रविवारी (दि. १२ जुलै) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानच्या वतीने २८१ ग्रॅम वजनाचे अत्यंत आकर्षक सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करण्यात आले. संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या पावन उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न झाला.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तुळजापूर तीर्थक्षेत्रात भाविकांची मोठी गर्दी होती. या पवित्र प्रसंगी श्री क्षेत्र उमरखेड (जि. यवतमाळ) येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती प.पू. माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते आदिमायेचा विधिवत अभिषेक, महापूजा आणि भावपूर्ण ओटी भरण्यात आली.
या मंगल प्रसंगी चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. महेश कनकदंडे आणि सौ. मोहिनीताई कनकदंडे यांनी मोठ्या भक्तिभावाने २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केले. या सुवर्ण अलंकाराने देवीचे रूप अधिकच खुलून दिसणार आहे.
संस्थानतर्फे स्वामी महाराजांचा विशेष सन्मान
प.पू. स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विशेष डोलीची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन सोहळा पूर्ण झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने प.पू. स्वामी महाराज, तसेच सुवर्ण अलंकार अर्पण करणारे ॲड. महेश कनकदंडे आणि सौ. मोहिनीताई कनकदंडे यांचा श्री देवीजींची पवित्र प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याची आणि दातृत्वाची चर्चा सध्या तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यात मोठ्या कौतुकाने केली जात आहे.
0 Comments