धाराशिव | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
वाढते तापमान, हवामान बदल आणि वायू प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब ऑफ धाराशिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उपपरिसरात 'वन महोत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध प्रजातींच्या २०० वृक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात आली.
या वन महोत्सवाचा शुभारंभ विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. इंद्रजित आखाडे आणि सचिव रो. निशांत होनमुटे, रोटरी क्लबचे डायरेक्टर अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या मोहिमेत करंज, कांचन, सीताफळ, गजगा, जांभूळ आणि सिसम यांसारख्या पर्यावरणपूरक आणि स्थानिक वातावरणात टिकणाऱ्या वृक्षांची रोपे लावण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता त्यांच्या संवर्धनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
आज संपूर्ण जगाला हवामान बदलाचे (क्लायमेट चेंज) तीव्र चटके बसत आहेत. तापमान वाढ, पाण्याची वाढती टंचाई आणि जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी लोकसहभागातून वृक्षलागवड वाढवणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या रक्षणासाठी वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, असा सूर याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण पर्यावरण मोहिमेत रो. रविंद्र साळुंखे, रो. सुनील गर्जे, रो. प्रदीप खामकर, रो. सुरज कदम,रो.अमोल माने व इतर रोटरी सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते.
तसेच विद्यापीठ उपपरिसराचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गोविंद कोकणे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. विक्रम शिंदे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, व्यवस्थापन शास्त्र विभागप्रमुख डॉ. सुयोग अमृतराव, कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. सचिन बसैय्ये, गणित विभागप्रमुख डॉ. राधाकृष्ण तिगोटे, डॉ. जितेंद्र शिंदे आणि कक्ष अधिकारी विद्याधर गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले.
0 Comments