Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खेंदाड सरांचे योगदान येडेश्वरी प्रशालेसाठी सदैव दीपस्तंभ ठरेल; मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांचे गौरवोद्गार; सहशिक्षक सुनील खेंदाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सेवापूर्ती सोहळा संपन्न३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; प्रशालेला 'डिजिटल बोर्ड' तर सरांना 'इनिव्हा' गाडी भेट

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेचे कर्तव्यदक्ष सहशिक्षक सुनील बाबूराव खेंदाड ३० जून २०२६ रोजी आपल्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्त प्रशालेच्या वतीने भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उपस्थित ग्रामस्थ, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहिला. मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख व माजी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या हस्ते खेंदाड सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनीषाताई खेंदाड यांचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांचे मुख्य वक्तव्य:
प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी प्रास्ताविकात सुनील खेंदाड सरांच्या १९९२ मधील नियुक्तीपासूनच्या खडतर प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्याध्यापक बनसोडे म्हणाले,

"खेंदाड सर म्हणजे केवळ हिंदीचे शिक्षक नव्हते, तर ते शिस्त, वेळेचे बंधन आणि विद्यार्थीप्रेम यांचा त्रिवेणी संगम होते. १९९४ च्या काळात अवघ्या ७ विद्यार्थिनींपासून सुरू झालेला हा प्रवास आज इयत्ता १० वीच्या वर्गात ८० विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला आहे, यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनामुळे हिंदी विषयात प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम राहिली. 'माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत शाळेला मिळालेल्या १ लाख रुपयांच्या बक्षिसामागे सरांचे मोठे योगदान असून, त्यांचे हे अमूल्य कार्य येडेश्वरी प्रशालेच्या यशस्वीतेसाठी सदैव दीपस्तंभ ठरेल."

गाडी अन् डिजिटल बोर्डची अनोखी भेट
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, सेवानिवृत्तीचे औचित्य साधून सुनील खेंदाड सर यांचे सुपुत्र सुमित (इंजिनिअर) यांनी वडिलांच्या प्रदीर्घ सेवेचा मान राखत त्यांना 'इनिव्हा गाडी' (Innova) भेट दिली. तर दुसरीकडे, खेंदाड सरांनीही शाळेप्रती असलेली आपली कृतज्ञता जपत विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवता यावेत यासाठी प्रशालेला एक आधुनिक 'डिजिटल बोर्ड' भेट दिला.

भावना अनावर: खेंदाड सरांचे डोळे पाणावले
सत्काराला उत्तर देताना सुनील खेंदाड सरांना आपल्या भावना अनावर झाल्या. "मी शाळेतील मुलींना नेहमी स्वतःची मुले मानून शिकवले आणि आज ग्रामस्थ व पालकांनी दिलेल्या या अथांग प्रेमामुळे माझ्या कामाची पोचपावती मला मिळाली," असे म्हणताना खेंदाड सरांचे डोळे पाणावले होते.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले, सरपंच सुजित हंगरगेकर, माजी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच अनिल बनसोडे, शाळा समिती अध्यक्ष शिवदास चटके, पत्रकार उमाजी गायकवाड यांच्यासह परिसरातील शिक्षणप्रेमी, माजी मुख्याध्यापिका पाटील मॅडम व सुजाता जुगदार, आजी-माजी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी मानले.

Only न्युज धाराशिव - गुरुजनांचा सन्मान, आमची जबाबदारी 🚩✍️

Post a Comment

0 Comments