Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने थाटात प्रारंभ!​सिंहासनावर मूर्तीची प्रतिष्ठापना | भाविकांच्या शिस्तबद्ध उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला विधी | वावरीची माती अन् पवित्र तीर्थाच्या कलशाने घटस्थापना

​Only न्युज धाराशिव / तुळजापूर
​महाराष्ट्राची कुलस्वामिनी, अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज रविवारी (दि. ११) आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या मुहूर्तावर अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात घटस्थापनेने प्रारंभ झाला. पहाटेच्या सुमारास श्री तुळजाभवानी देवीची पारंपरिक पद्धतीने सिंहासनावर मुख्य प्रतिष्ठापना करण्यात आली, तर दुपारी विधीवत घटस्थापना पार पडली.

​दुपारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापनेचा मुख्य धार्मिक विधी संपन्न झाला.

​याप्रसंगी आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकारी, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह विविध पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​परंपरेची अलौकिक गुंफण: शिवकालीन माती अन् पवित्र तीर्थाचा कलश
​श्री तुळजाभवानी मंदिरातील घटस्थापनेला शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. सिंहाच्या गाभाऱ्यात देवीच्या डाव्या बाजूला घट बसवला जातो.

​शिवकालीन माती ('वावरी'): छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री तुळजाभवानी देवीस अर्पण केलेल्या विशेष जमिनीतील पवित्र माती घटस्थापनेसाठी आणली जाते. या मातीला स्थानिक भाषेत 'वावरी' असे म्हटले जाते.

​गंगा आवाहन व कलश यात्रा: धाकट्या तुळजापुरातील कुंभार कुटुंबीयांकडून पारंपरिक कलश आणला जातो. या कलशात गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पवित्र जल भरले जाते. गोमुख तीर्थाजवळ जिल्हाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत 'गंगा आवाहन' केल्यानंतर वाजत-गाजत हा घटकलश गाभाऱ्यात आणून स्थापित केला जातो.

​सप्तधान्य अन् नागवेलीची पहिली माळ: शेटे कुटुंबीयांकडून प्राप्त झालेले सप्तधान्य (जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका आणि सातू) अर्पण करून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घट बसवला जातो. यानंतर देवीची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नागवेलीच्या पानांची पहिली माळ' घटावर अर्पण करण्यात आली.
​घटस्थापनेचा हा मंगलमयी विधी पार पडल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने ब्राह्मणांना पाठ, हवन आणि नवरात्रातील विशेष अनुष्ठानासाठी अधिकृत 'वर्णी' देण्यात आली. घटस्थापनेनंतर आता पुढील नऊ दिवस तुळजापूर नगरीत भक्तीचा गजर आणि धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments