'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जून २०२५ मध्ये ‘आयबीपीएस’ (IBPS) संस्थेमार्फत पार पडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कन्या सौ. शोभा धीरज गिरमे यांनी अत्यंत देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांनी या परीक्षेत २०० पैकी १२६ गुण मिळवून ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेत ‘उपशिक्षिका’ म्हणून आपली निवड निश्चित केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या शोभा यांच्या या यशामुळे काटी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सौ. शोभा गिरमे या काटी येथील स्व. भालचंद्र तायप्पा ढगे यांच्या कन्या होत. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सातत्याने अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवले. बालपणापासूनच शिक्षण क्षेत्राची आवड आणि तीव्र जिद्द यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या कठीण आव्हानावर मात केली. आयबीपीएसच्या पारदर्शक आणि काठिण्य पातळी उच्च असलेल्या परीक्षेत त्यांनी मिळवलेले हे यश गुणवत्तेची साक्ष देणारे आहे.
शिक्षकाची भूमिका ही केवळ नोकरी नसून भावी पिढी घडवण्याचे समाजकार्य आहे, ही भावना उराशी बाळगून त्यांनी या क्षेत्राची निवड केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नातेवाईक, ग्रामस्थ, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांसाठी शोभा गिरमे यांचे हे यश अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत आहे.
आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी पती श्री. धीरज गिरमे, दिवंगत वडील स्व. भालचंद्र ढगे, आई, माहेरचे व सासरचे कुटुंब तसेच मार्गदर्शकांना दिले आहे. भावी पिढीला सुसंस्कारित व सक्षम बनवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील आपल्या कार्यकाळात पूर्ण निष्ठेने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
0 Comments