"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील नामांकित 'येडेश्वरी कन्या प्रशाले'चे कर्तव्यदक्ष आणि आदर्श सहशिक्षक सुनील बाबूराव खेंदाड हे आपल्या प्रदीर्घ व निष्कलंक सेवाकाळानंतर ३० जून २०२६ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या तब्बल ३४ वर्षांच्या ज्ञानदानाच्या पवित्र यज्ञाची सांगता अत्यंत भावपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात करण्यात आली. या सेवापूर्ती निमित्त प्रशालेच्या वतीने भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात खेंदाड सरांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करताना उपस्थित ग्रामस्थ, सहकारी शिक्षक आणि हजारो विद्यार्थिनींच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहिला.
वैभवाचा त्रिवेणी संगम: भरपेरावा आहेर ,ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार
सोलापूर येथील मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, माजी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या शुभहस्ते खेंदाड सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनीषाताई खेंदाड यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मौल्यवान ग्रंथ भेट देऊन सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. सुरुवातीला मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांचा सत्कार सभापती विक्रमसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काटी ग्रामपंचायत, मराठा समाज सेवा मंडळ आणि येडेश्वरी प्रशालेच्या वतीने सरांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शाळेच्या यशाचे शिल्पकार: १००% निकालाची परंपरा
प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी प्रास्ताविकात सरांच्या १९९२ मधील नियुक्तीपासूनच्या खडतर प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, "खेंदाड सर म्हणजे केवळ हिंदीचे शिक्षक नव्हते, तर ते शिस्त, वेळेचे बंधन आणि विद्यार्थीप्रेम यांचा त्रिवेणी संगम होते. सुरुवातीच्या काळात अवघ्या ७ विद्यार्थिनींपासून सुरू झालेला हा प्रवास आज इयत्ता १० वीच्या वर्गात ८० विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला आहे, यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अध्यापनामुळे हिंदी विषयात १००% निकालाची परंपरा कायम राहिली. 'माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत शाळेला मिळालेल्या १ लाख रुपयांच्या बक्षिसामागे सरांचे मोठे योगदान असून, ते प्रशालेच्या यशस्वीतेसाठी दीपस्तंभ ठरले आहेत."
मान्यवरांची गौरवोद्गार
"सरांची लोकप्रियता पाहून थक्क झालो!"
"आमच्या संस्थेअंतर्गत ५ शाळांमधून ४५० शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, खेंदाड सरांनी ३४ वर्षे जी उत्कृष्ट सेवा केली आणि जो अफाट लोकसंग्रह मिळवला, त्याची मला पूर्वकल्पना असती तर ते आज संस्थेचे संचालक राहिले असते. माणूस वयोमानानुसार केवळ सेवेतून निवृत्त होतो, कर्तव्यातून नाही. या परिसरात लवकरच ११ वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा आमचा मानस आहे."
— मनोहर सपाटे (अध्यक्ष, मराठा समाज सेवा मंडळ, सोलापूर)
"शांत, संयमी आणि निकालात सातत्य ठेवणारे गुरुवर्य"
"गेल्या ३४ वर्षांच्या येडेश्वरी कन्या प्रशालेच्या चढ-उतार आणि वाटचालीचे आम्ही साक्षीदार आहोत. खेंदाड सरांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, संयमी आणि हसमुख राहिले. शाळेत सर्वात प्रथम येणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. निकालातील सातत्य आणि प्रशालेच्या वैभवात त्यांचे योगदान अतुलनीय आहे."
— विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती तुळजापूर)
"खरे मुख्याध्यापक खेंदाड सरच होते!"
"मी १९९४ साली गटशिक्षणाधिकारी असताना या शाळेला ग्रॅन्ट मिळवून देण्यासाठी आणि 'को-एज्युकेशन' मंजुरीसाठी तात्काळ प्रयत्न केले. या शाळेचे पडद्यामागचे खरे मुख्याध्यापक सुनील खेंदाड सरच होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज सरांच्या संस्कारांची पुण्याई त्यांच्या कुटुंबात दिसते आहे. त्यांची दोन्ही मुले आणि जावई उच्चशिक्षित (इंजिनिअर) आहेत."
— अर्जुन जाधव (माजी गटशिक्षणाधिकारी, तुळजापूर)
"गावातील पिढ्या घडवण्याचे काम सरांनी केले"
"खेंदाड सरांनी माझ्या गावातील अनेक पिढ्या आणि विद्यार्थी घडवले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कला अफाट होती. या कार्यक्रमाला जमलेली अथांग गर्दी हीच त्यांच्या ३४ वर्षांच्या प्रामाणिक कामाची खरी पावती आहे."
— सुजित हंगरगेकर (सरपंच, काटी)
"कुठलीही तक्रार न करता केवळ ज्ञानार्जन"
"सुरुवातीच्या विनाअनुदानित काळात या शिक्षकांनी प्रचंड कष्ट उपसले. ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत खेंदाड सरांची कधीही, कोणाकडेही तक्रार आली नाही. 'माझी शाळा, माझी विद्यार्थिनी' याच भावनेतून त्यांनी सदैव गुणवत्ता वाढीकडे लक्ष दिले."
— आदेश कोळी (माजी सरपंच, काटी)
माजी मुख्याध्यापिका आणि विद्यार्थिनींच्या भावना:
माजी मुख्याध्यापिका पाटील मॅडम आणि सुजाता जुगदार यांनी सरांच्या लोकसंग्रहाचा आणि संघर्षाच्या काळातील मार्गदर्शनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. विद्यार्थिनी श्रावणी देशमुख हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले, "शिक्षक हाच शाळेचा खरा आत्मा असतो, सरांनी आमच्यात आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता निर्माण केली. त्यांची पोकळी आम्हाला सदैव भासत राहील."
कृतज्ञतेची आगळीवेगळी भेट: गाडी अन् डिजिटल बोर्ड!
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, सेवानिवृत्तीचे औचित्य साधून सुनील खेंदाड सर यांचे सुपुत्र सुमित (जे स्वतः इंजिनिअर आहेत) यांनी वडिलांच्या प्रदीर्घ सेवेचा मान राखत त्यांना अत्यंत दिमाखदार अशी 'इनिव्हा गाडी' (Innova) भेट दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या गाडीची चावी खेंदाड सरांकडे सुपूर्द करण्यात आली.
दुसरीकडे, खेंदाड सरांनीही शाळेप्रती असलेली आपली कृतज्ञता जपली. त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवता यावेत, यासाठी प्रशालेला एक आधुनिक 'डिजिटल बोर्ड' उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट दिला.
भावना अनावर: खेंदाड सरांचे डोळे पाणावले
सत्काराला उत्तर देताना सुनील खेंदाड सरांना आपल्या भावना अनावर झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, "१९९४ च्या काळात केवळ ७ विद्यार्थिनींवर आम्ही काम करत होतो, आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. जीवनात प्रामाणिक काम केले की पालकांचे आणि ग्रामस्थांचे भरभरून प्रेम मिळते, याची प्रचिती आज मला आली. मी शाळेतील मुलींना नेहमी स्वतःची मुले मानून शिकवले आणि त्याचीच पुण्याई म्हणून आज माझी दोन्ही मुलेही जीवनात यशस्वी झाली." हे बोलताना सरांसह संपूर्ण सभागृहाचे डोळे ओलावले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले, जनरल सेक्रेटरी महेश माने, शाळा समिती अध्यक्ष शिवदास चटके, पत्रकार उमाजी गायकवाड, उपसरपंच अनिल बनसोडे, चंद्रकांत काटे, विनायकराव पाटील, अशोक जाधव, सयाजीराव देशमुख, मकरंद देशमुख, विद्यासागर ढगे, रामहरी थोरबोले, बाळासाहेब शिंदे, अनिल गुंड, संपत पंखे, कदम डी.आर., संजय भूमकर (वैराग), अमित पाटील, विस्तार अधिकारी बेताळे, सहशिक्षक गणेश गुंगे, गणेश सोमवंशी, सौ. पाटील व्ही.बी., श्रीमती सुजाता जुगदार, माजी सरपंच मिराताई ढगे, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन कोळी, दादा बेग, अरविंद ढगे, दलितमित्र नंदू बनसोडे, अनुसया बनसोडे,रामेश्वर लाडुळकर, शाम गाटे,अन्नु पठाण, सुनिल परिट,उद्धवराव पाटील यांच्यासह परिसरातील शिक्षणप्रेमी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी हायस्कूल (सोलापूर) च्या शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक किशोर बनसोडे यांनी मानले. सोहळ्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
Only न्युज धाराशिव - गुरुजनांचा सन्मान, आमची जबाबदारी 🚩✍️
0 Comments