तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव'वृत्तसेवा
देशसेवेचे व्रत घेऊन भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या मोर्डा गावचे सुपुत्र विशांत जगन्नाथ सुरवसे यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी हलगी-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. ‘भारत माता की जय’, ‘जय जवान’च्या घोषणांनी अवघा मोर्डा परिसर दणाणून गेला.
शेतकरी कुटुंबातून सैन्यदलापर्यंतचा प्रवास
विशांत सुरवसे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील. घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्यांनी आर्मी भरतीची ‘अग्निपथ’ योजना पार केली. पहाटे 4 वाजता उठून धावणे, व्यायाम आणि अभ्यास, असा दिनक्रम त्यांनी मागील 2 वर्षे सातत्याने पाळला.
तरुणांसमोर आदर्श निर्माण
“मोबाईल आणि व्यसनापासून दूर राहा, देशसेवेचे स्वप्न बाळगा,” असा संदेश विशांतने यावेळी गावातील तरुणांना दिला. त्याच्या यशाने मोर्डा गावातील अनेक युवकांनी सैन्य भरतीची तयारी सुरू केली आहे.
ग्रामस्थांनी केला शाल-श्रीफळाने गौरव
गावातील हनुमान मंदिरापासून निघालेली मिरवणूक प्रमुख मार्गावरून ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहोचली. तिथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने विशांतचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत होता.
“गावाची मान उंचावली” - राहुल जाधव
“विशांतने आर्मीमध्ये जाऊन मोर्डा गावचे नाव संपूर्ण तालुक्यात मोठे केले. तो आमच्या गावाचा अभिमान आहे,” अशा भावना समाजवादी पार्टी तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांनी व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित मान्यवर
माजी सरपंच राजाभाऊ शेंडगे,शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सुरवसे, प्रथमेश सुरवसे, आकाश सुरवसे, रमेश सुरवसे, बंटी सुरवसे, माजी सरपंच सुमंत कोळेकर, प्रविण सातपुते, ग्रामपंचायत सदस्या सौ.सविता पांडागळे, श्रीमंत पांडागळे व शेकडो ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Only न्युज धाराशिव - गावच्या पोरांचं कर्तृत्व, जगभर पोहोचवू 🚩✍️
0 Comments