तुळजापूर | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
आरळी (बु.) ते कोळेगाव आणि आरळी (बु.) ते आरळी (खुर्द) या रस्त्याचे काम तातडीने मंजूर करून ते मार्गी लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत १८ मे २०२६ रोजीच पहिले निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही या कामाची प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या विलंबामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता बंद असल्याचा फटका थेट जनजीवनाला बसत असून, शनिवारी भरणारा आठवडी बाजार, गावचा व्यापार आणि आरोग्य सेवांवरही याचे गंभीर परिणाम होत आहेत.
रस्ता दुरुस्तीअभावी बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने आता तरी तत्परता दाखवून रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल, असे सौ. माडजे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
0 Comments