"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
नोकरी, व्यवसाय आणि कर्तृत्वाच्या निमित्ताने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीत स्थायिक झालेल्या, परंतु अंतकरणात तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक काटी गावच्या मातीचा सुवास जपलेल्या 'पुण्यातील काटीकरांचा' एक अभूतपूर्व आणि भावनिक स्नेहमेळावा नुकताच कोथरुड येथील गांधी भवन येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. निमित्त होते निवृत्त महापालिका आयुक्त विलास विश्वनाथ ढगे यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे. आपल्या वाढदिवसाचे कोणतेही अवडंबर न माजवता, पुण्यात विखुरलेल्या आपल्या गावच्या नागरिकांना एकाच छताखाली आणून ऋणानुबंध घट्ट करण्याचा विलास ढगे व सौ. सविता ढगे या दाम्पत्याचा हा स्तुत्य उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काटी गावचे अनेक सुपुत्र आणि सुकन्या पुण्याच्या विविध भागात उच्च पदस्थ अधिकारी, आयटी प्रोफेशनल्स, उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत, तर काहीजण सेवानिवृत्त होऊन येथेच स्थायिक झाले आहेत. धावपळीच्या या महानगरीय जीवनात एकमेकांशी संपर्क तुटू नये आणि गावाकडची नाळ कायम राहावी, या उद्देशाने विलास ढगे यांनी पुढाकार घेऊन 'पुण्यातील काटीकर' या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एकत्र गुंफले. या मेळाव्यात जवळपास ७० ते ७५ काटीकरांनी सहकुटुंब उपस्थित राहून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
जाती-धर्माच्या भिंती पलीकडचे 'काटी' पॅटर्न!
काटी गावाची संस्कृती ही नेहमीच सर्वधर्मसमभावाची आणि एकोप्याची राहिली आहे. हाच वारसा पुण्यातही पाहायला मिळाला. सर्व जाती-धर्माच्या भिंती बाजूला सारून, केवळ 'आपलं गाव' या भावनेने सर्वजण एकत्र आले होते. या मेळाव्यात बालपणीच्या गप्पा, गावाकडच्या आठवणी, शाळा-कॉलेजच्या दिवसांतील किस्से सांगताना अनेक ज्येष्ठ आणि तरुण मंडळी भावूक झाली होती. औपचारिकतेचे सगळे मुखवटे बाजूला सारून सर्वांनी अस्सल गावरान आठवणींमध्ये धम्माल केली आणि एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी आपला परिचय, पुण्यातील वास्तव्याचे ठिकाण, नोकरी-व्यवसायाचे स्वरूप याबद्दल माहिती दिली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संपूर्ण ढगे परिवाराचे उपस्थितांनी जाहीर आभार मानले. हा केवळ एक दिवसाचा मेळावा नसून, यापुढे दरवर्षी पुण्यातील ग्रुपमधील सदस्यांनी पुढाकार घेऊन हा मेळावा अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करावा आणि एकमेकांना सामाजिक व कौटुंबिक स्तरावर आधार देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
सामाजिक दायित्व पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर
"केवळ वाढदिवस साजरा करणे हा यामागील हेतू नव्हता, तर महानगरात राहताना आपल्या माणसांची सुख-दुःखे एकमेकांना कळावीत, संकटसमयी हक्काची माणसे पाठीशी उभी राहावीत, हे यामागचे मुख्य सूत्र होते. काटी गावातील शिस्त आणि शैक्षणिक संस्कारांमुळे आज आपली मुले पुण्यात मोठ्या पदांवर आहेत. हे सामाजिक दायित्व पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू."
— विलास ढगे (मुख्य आयोजक व सेवानिवृत्त महापालिका आयुक्त)
"पुण्यासारख्या मोठ्या शहरात धावपळीच्या जीवनात आपण शेजाऱ्यालाही ओळखू शकत नाही. अशा वातावरणात आपल्या गावातील ७०-७५ लोक एकत्र येणे ही खूप मोठी आणि सुखद गोष्ट आहे. विलास ढगे सरांच्या या संकल्पनेमुळे आम्हाला पुण्यात एक हक्काचे 'गाव' मिळाले आहे."
— अनिल ढगे, पुणे काशीकर (उद्योजक)
"अनेक वर्षांनंतर बालपणीचे मित्र आणि गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र आल्याने मन भूतकाळात रमून गेले. काटीकरांनी तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातही पुण्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. हा स्नेहमेळावा आमच्या पुढील पिढीला गावाशी जोडून ठेवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल."
— इंजि. प्रशांत काटीकर (उपस्थित सदस्य)
"गाव सोडल्यानंतर अनेक वर्ष नोकरी-व्यवसायात गेली. पण आज इथे आल्यावर पुन्हा एकदा शाळेच्या बाकावर बसल्याचा भास झाला. हा उपक्रम केवळ आनंदाचा क्षण नाही, तर पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक काटीकराला मानसिक बळ देणारा कौटुंबिक आधारवड आहे."
— सुहास कुलकर्णी (उपस्थित सदस्य)
"व्यवसाय आणि उद्योगाच्या क्षेत्रात काटी गावातील तरुण कुठेही कमी नाहीत, हे आज इथे आलेल्या उद्योजकांची संख्या पाहून सिद्ध होते. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपल्या माणसांसाठी काय करता येईल, यासाठी हा मंच भविष्यात खूप उपयोगी पडेल."
— बळीराम ढगे,पुणे कोथरुड (उद्योजक)
"गावाकडच्या आठवणी हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील हळवा कोपरा असतो. साहित्यात जे ऋणानुबंध आपण लिहितो, ते आज इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. संस्कृती, विचार आणि मातीची ओढ एकत्र आल्यावर काय जादू होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा मेळावा आहे."
— डॉ. उमा उत्तम काळे (साहित्यिका)
यांची होती प्रामुख्याने उपस्थिती:
या स्नेहमिलन सोहळ्याला आयोजक विलास ढगे, सौ. सविता विलास ढगे, उद्योजक बळीराम ढगे, अनिल ढगे, प्रशांत काटीकर, सुहास कुलकर्णी, काशिनाथ माळी, रोशन ढगे, कोमल ढगे, कविता अंबुरे, नारायण ढगे, साहित्यिका डॉ. उमा काळे, रतनताई शिंदे (साळुंके), जयाजी देशमुख, राजेश साळुंके, श्रुती जोशी-बेंबळकर, सुप्रिया जांभळे (ढगे), शंकर माळी, अनिता माळी, कुशल ढगे, बळीराम सावरगावकर, सुरज काळे आदींसह काटी गावातील अनेक मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन ढगे परिवाराच्या वतीने अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले.
0 Comments