Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सहकारात 'इंडिया को-ऑप'ची यशस्वी भरारी! जिल्हाभर शाखा विस्ताराचा सुहास पाटलांचा सल्ला, रणदिवेंवर पुन्हा विश्‍वास; संस्थेच्या अध्यक्षपदी धनंजय रणदिवे, उपाध्यक्षपदी मंजुषा कुलकर्णी तर सचिवपदी नाईकनवरे यांची फेरनिवड

धाराशिव | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
अल्पावधीतच आपल्या पारदर्शक आणि आधुनिक कार्यप्रणालीने सहकार आणि बँकिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'इंडिया को-ऑप क्रेडिट सोसायटी'ची अत्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. धाराशिव येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेने आता आपला विस्तार वाढवणे गरजेचे असून, संपूर्ण जिल्हाभर इंडिया सोसायटीच्या शाखा निर्माण व्हाव्यात, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी सुहास पाटील यांनी केले.

धाराशिव येथील इंडिया को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नुकतीच एक विशेष सभा पार पडली, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
इंडिया को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यानंतर संस्थेच्या धाराशिव येथील मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण सभेत पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. यात संस्थेचे संस्थापक धनंजय श्रीमंतराव रणदिवे यांची अध्यक्षपदी, सौ. मंजुषा कल्याण कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी, तर राजेंद्र सिताराम नाईकनवरे यांची सचिवपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

अत्याधुनिक सुविधा आणि पारदर्शक कारभार
नूतन पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना मार्गदर्शन करताना सुहास पाटील म्हणाले की, "इंडिया को-ऑप सोसायटी स्थापनेपासूनच स्वमालकीच्या जागेत सुरू करण्यात आली, ही संस्थेसाठी अत्यंत जमेची आणि अभिमानाची बाजू आहे. सध्याच्या काळात बँकिंग क्षेत्रात मोठी स्पर्धा असताना, संस्थेने प्रारंभापासूनच ग्राहकांसाठी एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस (SMS) यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच सुरक्षिततेसाठी 'स्ट्राँग रूम लॉकर्स'ची सुविधा देत सोसायटी परिपूर्ण बँकिंग सेवा देत आहे, ही बाब गौरवास्पद आहे. संस्थेच्या या यशस्वी आणि पारदर्शक कारभारामुळे आता जिल्हाभर शाखांचे कार्यक्षेत्र विस्तारणे गरजेचे आहे. सहकार व वित्तीय क्षेत्रातील एक 'आदर्श संस्था' म्हणून इंडिया सोसायटी नावारूपास येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती: अध्यक्ष धनंजय रणदिवे
"सहकारातून समृद्धी या तत्त्वावर आम्ही 'इंडिया को-ऑप सोसायटी'ची उभारणी केली आहे. स्थापनेपासूनच ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या तोडीची अत्याधुनिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. सभासद आणि ग्राहकांनी आमच्या पारदर्शक कारभारावर जो अढळ विश्वास दाखवला, तोच आमच्या यशाचा मुख्य पाया आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी पाटील साहेबांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे आगामी काळात संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सोसायटीचे जाळे विस्तारण्यावर आमचा भर राहील. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी संस्था नवनवीन योजना घेऊन येईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख सेवा या त्रिसूत्रीवर आमची पुढील वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील."
- धनंजय श्रीमंतराव रणदिवे, संस्थापक अध्यक्ष, इंडिया को-ऑप क्रेडिट सोसायटी.

विविध मान्यवरांची उपस्थिती
या सभेच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी सुहास पाटील यांचे संस्थेचे सचिव राजेंद्र नाईकनवरे व संचालक सुशांत सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या सभेस नूतन उपाध्यक्ष सौ. मंजुषा कुलकर्णी, संचालक कुलदीप सावंत, सुभाष शेट्टी, भागवत शिंदे, योगेश रायबान, भाग्यश्री रणदिवे, अनिता स्वामी, किरण अडसुळे तसेच तज्ज्ञ संचालक ॲड. सूर्यकांत आनंदे आणि ॲड. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन संचालक कुलदीप सावंत, सुशांत सोनवणे आणि ॲड. आनंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सभेचे आभार प्रदर्शन सचिव राजेंद्र नाईकनवरे यांनी केले. तर, ही विशेष सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी गजानन हालसे, निवृत्ती जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments