तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
लोहगड किल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरून ३५० फूट खोल दरीत कोसळल्याने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील तरुण व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल (वय २५) यांचा झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा धक्कादायक खुलासा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. हा अपघात नसून केतन यांच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेला 'प्री-प्लान्ड मर्डर' (पूर्वनियोजित खून) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी होणारी पत्नी सिया प्रवीण बसेसर गोयल (वय २०) आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (वय २२) या दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या थरारक हत्याकांडामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यातील व्यावसायिक व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
१७ कोटींचे भव्य लग्न आणि कोट्यवधींचे साम्राज्य
मृत केतन अग्रवाल हे तुळजापूरचे प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र आणि डी. के. अग्रवाल यांचे नातू होते. व्यवसायानिमित्त अग्रवाल कुटुंब सध्या पुण्याच्या गहुंजे येथील उच्चभ्रू 'लोधा बेलमंडो सोसायटी'त वास्तव्यास होते. केतन हे कुटुंबाच्या रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायात सक्रिय होते. त्यांचा विवाह नोव्हेंबर महिन्यात जयपूर येथील एका अलिशान महालात १७ कोटी रुपये खर्च करून अतिशय थाटामाटात होणार होता. या शाही विवाहासाठी दोन विशेष विमानेही (चार्टर्ड प्लेन) बुक करण्यात आली होती. मात्र, या भव्य दिव्यांमागे एक भयानक कट शिजत होता, याची पुसटशी कल्पनाही अग्रवाल कुटुंबाला नव्हती.
प्रेमसंबंधातून दोनदा रचला हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, मात्र कौटुंबिक दबावामुळे तिने साखरपुडा केला होता. हे लग्न मोडण्यासाठी आणि केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतनने लागोपाठ तीन भयंकर कट रचले:
पहिले दोन प्रयत्न अपयशी: यापूर्वी इंडोनेशियातील बाली येथे होणारी 'प्री-वेडिंग ट्रिप' रद्द व्हावी म्हणून सियाने स्वतःचा पासपोर्ट फाडून टाकला होता. त्यानंतर महाबळेश्वर येथेही केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता, परंतु तो फसला. इतकेच नव्हे तर, ३१ मे २०२६ रोजी लोहगडावरच सापाची भीती दाखवून त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाला होता, पण तिथेही केतन सुदैवाने वाचला होता.
वाढदिवसाचा ठरला शेवटचा दिवस: अखेर १८ जून २०२६ रोजी सियाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केतनला पुन्हा लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी नेण्यात आले. तिथे पूर्वनियोजित कटानुसार चेतन चौधरी आधीच दबा धरून बसला होता.
असा उघडकीस आला 'परफेक्ट मर्डर'चा बनाव
१८ जून रोजी घटनेनंतर सियाने 'फोटो काढताना केतनचा पाय घसरला' असा कांगावा केला होता. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (AD No. 36/2026) नोंद केली होती. मात्र, केतन यांच्या वडिलांनी सियाच्या संशयास्पद वागणुकीबद्दल पोलिसांकडे तक्रार केली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंह गील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन, व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासले असता, घटनास्थळी प्रियकर चेतन चौधरी देखील हजर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सिया आणि चेतनने गुन्ह्याची कबुली दिली.
अनसेफ कड्याजवळ नेऊन थेट दरीत ढकलले
१८ जून रोजी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या बहाण्याने सियाने केतनला किल्ल्याच्या एका अत्यंत धोकादायक (Unsafe) कड्यावर नेले. "तुझा चांगला फोटो काढते," असे सांगून त्याला कड्याच्या अगदी टोकावर उभे केले गेले. केतनचे लक्ष विचलित होताच सिया आणि तिथे दबा धरून बसलेल्या चेतनने मिळून केतनला ३५० ते ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार (कलम १०३-खून, १०९-कट रचणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. तरुण आणि उमद्या केतन अग्रवाल यांच्या अशा क्रूर अंत्यामुळे तुळजापूर आणि अग्रवाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 Comments