'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बापाचा संघर्ष डोळ्यांसमोर ठेवत, तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या ग्रामीण भागातील एका उमद्या तरुण कवीने थेट भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेला आपल्या शब्दांचे कोंदण दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ परिसरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या पुण्यातील शहीद मेजर प्रदीप ताथवडे (कीर्ती चक्र) यांच्या जीवनकार्यावर आधारित 'शौर्यदीप' या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'लडाख टुडे' या वृत्तपत्रात या माहितीपटाची बातमी प्रसिद्ध होताच, या माहितीपटासाठी अत्यंत भावूक आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेली गीते लिहिणारा काटीचा सुपुत्र चि. अथर्व अर्चना बळीराम ढगे सध्या कौतुकाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
बापाचा संघर्षाचा वारसा आणि मुलाची वाङ्मयीन भरारी
अथर्वची ही यशोगाथा जितकी प्रेरणादायी आहे, तितकीच त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी थक्क करणारी आहे. मूळचे तुळजापूर तालुक्यातील काटी येथील असलेले त्याचे वडील बळीराम (बळी) हणमंत ढगे यांनी १९८५ मध्ये अवघ्या अंगावरच्या कपड्यांनशी गाव सोडले होते. केवळ सातवी पास असलेल्या बळीराम यांनी सुरुवातीला ट्रकवर क्लिनर म्हणून, त्यानंतर मुंबईच्या वर्कशॉपमध्ये आणि दुग्ध व्यवसायात प्रचंड कष्ट उपसले. पुढे पुण्यात येत प्रसिद्ध चितळे बंधूंकडे १८ वर्षे नोकरी केली. १४ वर्षांपूर्वी कोथरूड भागात अवघ्या ५ हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या 'अथर्व व्हिजिटेबल, फ्रूट अँड फूड्स' या व्यवसायाचे आज एका मोठ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन साम्राज्यात रूपांतर झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात होम डिलिव्हरीच्या माध्यमातून वार्षिक सुमारे ३ कोटींची उलाढाल करत भाजी विक्रीतून करोडपती बनण्याचा चमत्कार त्यांनी करून दाखवला. या संघर्षात त्यांची अर्धांगिनी अर्चना ढगे यांनीही व्यवसायात आणि मुलांच्या शिक्षणात मोलाची साथ दिली.
वडिलांच्या या अथांग कष्टाची जाणीव ठेवत थोरला मुलगा अथर्व याने कला शाखेतून पदवी पूर्ण केली. तो केवळ सुशिक्षितच नाही, तर एक संवेदनशील लेखक, कवी आणि साहित्यिक म्हणून नावारूपास आला असून, त्याचा एक कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. तर दुसरा मुलगा ओंकार कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले असून सध्या दोघेही पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी करत आहेत. वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावत अथर्वने आपली वाङ्मयीन साधना सुरू ठेवली, ज्याचे फलित आज 'शौर्यदीप' च्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर आले आहे.
'शौर्यदीप' माहितीपटात शब्दांचे योगदान
शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त दिग्दर्शक शेखर नाईक यांनी सुमारे २ तास ३३ मिनिटांच्या या भव्य माहितीपटाची निर्मिती केली आहे. पूंछ, जम्मू, श्रीनगर, लेह-लडाख आणि सियाचीन बेस कॅम्प अशा दुर्गम भागात या माहितीपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या माहितीपटातील मुख्य गीते अथर्व ढगे याने लिहिली असून, त्याच्या लेखणीतून साकारलेली राष्ट्रभक्ती, सैनिकांविषयीचा आदर आणि शौर्याचा हुंकार यामुळे या कलाकृतीला एक वेगळीच भावनिक उंची प्राप्त झाली आहे.
या माहितीपटाला संगीतकार अथर्व वडके यांनी संगीतबद्ध केले असून, गायिका सानिका आपटे, अर्णव जोशी यांचे स्वर आणि नरेश गुंड यांचे प्रभावी निवेदन लाभले आहे. या उत्कृष्ट कलाकृतीद्वारे देशभक्तीची ज्योत जनमानसात अधिक तेजस्वी करण्यासाठी दिग्दर्शक शेखर नाईक, गीतकार अथर्व ढगे आणि संपूर्ण टीमवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील एका कष्टकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाने थेट देशाच्या वीर सैनिकाच्या गाथेत मानाचे पान मिळवणे, हा मराठवाड्यासाठी आणि काटी गावांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे
"पैसा कोणीही कमावेल, पण संस्कार कमावणे कठीण!
-वडील बळीराम (बळी) हणमंत ढगे
"संसाराचा गाडा खंबीरपणे ओढणारी 'अर्चना' आणि माझ्या संघर्षाला अभिमानाची उंची देणारी कर्तृत्ववान मुले निघाली इथेच माझ्या कष्टाचं खरं सोनं झालं!"
पुण्यासारख्या शहरात येऊन भाजी विकून माझी दोन्ही मुले जेव्हा निर्व्यसनी आणि कर्तृत्वाची शिखरं गाठणारी निघतात, तोच एका बापाचा सर्वात मोठा बहुमान आहे."
0 Comments