'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
देशातील भावी पिढी सुदृढ आणि पोलिओमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवार दि. २८ रोजी तुळजापूर शहरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने संपूर्ण शहरात विविध ३२ ठिकाणी लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये तीन विशेष फिरत्या पथकांचाही (Mobile Teams) समावेश होता, ज्यांनी बसस्थानक, धार्मिक स्थळे आणि मुख्य चौकांमध्ये जाऊन बालकांना सुरक्षिततेचा 'दोन थेंब' डोस पाजला.
शहरातील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयासमोर आयोजित विशेष लसीकरण शिबीराचे उद्घाटन पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. नळदुर्ग रोडवरील या केंद्रावर सुरुवातीला साधारण १०० बालकांना पोलिओ डोस दिला जाईल असा अंदाज प्रशासनाचा होता. मात्र, परिसरातील पालकांचा वाढता उत्साह आणि जागृततेमुळे या एकाच केंद्रावर तब्बल १८० बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला, जे या मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले, डॉ. हिराळे, डॉ. अखिलेशकुमार राठोड, आरोग्य निरीक्षक श्री. बनसोडे ए. यू., आरोग्य कर्मचारी श्री. पवार डी. एम. आणि ए.एन.एम. श्रीमती रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य यंत्रणेच्या चोख नियोजनामुळे प्रत्येक केंद्रावर लस सुरळीतपणे उपलब्ध झाली होती.
३२ केंद्रांवरवरून अविरत सेवा; 'आशा' आणि अंगणवाडी सेविकांचे योगदान
आरोग्य विभाग व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रत्येक प्रभागात, अंगणवाडी, शाळा व सार्वजनिक ठिकाणी एकूण ३२ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी ठीक ८ वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. दुपारनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी, 'आशा' स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक डोसपासून वंचित राहणार नाही याची खात्री केली. सकाळच्या सत्रातील कडक उन्हाची व दुपारी झालेल्या पावसाच्या वातावरणाची पर्वा न करता या रणरागिणींनी घरोघरी जाऊन बालकांचा शोध घेतला व त्यांना पोलिओ डोस दिला.
"पोलिओसारखा भयंकर आजार देशातून कायमचा हद्दपार करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत हा डोस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. तुळजापूरकरांनी दाखवलेली ही सामाजिक जाणीव आणि प्रशासनाला दिलेले सहकार्य कौतुकास्पद असून, यामुळेच ही मोहीम शंभर टक्के यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे."
- डॉ. दीपक चोरमले (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर)
सामाजिक संस्थांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक
कार्यक्रमादरम्यान पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या अविरत आणि प्रामाणिक कामाचे तोंडभरून कौतुक केले. समाजाच्या आरोग्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही अहोरात्र राबणाऱ्या वैद्यकीय पथकाचा त्यांनी विशेष सन्मान केला. यावेळी सिद्धेश्वर इंगोले, राहुल जाधव, प्रभाकर नलावडे, संजय इटकर, बाबुराव पुजारी, सहशिक्षक तानाजी म्हेत्रे आदींसह पुजारी नगर मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील दोन दिवस 'आयपीपीआय' अंतर्गत घरोघरी मोहीम
रविवारच्या मुख्य मोहिमेनंतरही जे बालक काही कारणास्तव केंद्रावर येऊ शकले नाहीत, अशा उर्वरित बालकांसाठी तालुका आरोग्य विभागाने पुढील दोन दिवस 'फॉलो-अप' मोहीम आखली आहे. या अंतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष घरी जाऊन बालकांचे लसीकरण करतील. प्रशासनाने आवाहन केले आहे की, ज्या पालकांनी अद्याप आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचा डोस दिला नसेल, त्यांनी पुढील दोन दिवसांत आरोग्य पथकाला सहकार्य करून आपल्या पाल्याचे लसीकरण करून घ्यावे आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे.
0 Comments