Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीच्या अक्षताने शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी; जिल्ह्यात एस.सी. गटात प्रथम;एल.जी. शिक्षण संकुलाच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला उजाळा


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द व चिकाटीच्या बळावर यशाला गवसणी घालता येते, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कु. अक्षता अमोल गायकवाड हिने. फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, या परीक्षेत अक्षताने अनुसूचित जाती प्रवर्गातून धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.

काटी येथील रहिवासी असलेली अक्षता सध्या बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील एल.जी. शिक्षण संकुलात इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील अक्षताने कोणत्याही खासगी क्लासची मदत न घेता, केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश खेचून आणले आहे. 

शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन : अक्षताला सहशिक्षक श्री. निलेश गायकवाड, सौ. मोनिका वीर व श्री. आनंद चव्हाण* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभ्यासाचे योग्य नियोजन, सराव परीक्षा व सातत्यपूर्ण मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी दिली. “अक्षता अभ्यासात अत्यंत हुशार व चिकाटी आहे. तिच्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे,” असे गौरवोद्गार संकुलाचे प्राचार्य यांनी काढले.

जिद्दीला सलाम : अक्षताचे वडील अमोल गायकवाड हे तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील कृषी तंत्र विद्यालय या कायम विनाअनुदानित विद्यालयात तुटपुंज्या मानधनावर प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. “मुलगी शिकून मोठी अधिकारी व्हावी, हेच आमचे स्वप्न आहे,” अशी भावना अक्षताची आई सौ. राजेश्री गायकवाड यांनी व्यक्त केली. अक्षताला पुढे डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याची इच्छा आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवीसाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

अक्षताच्या या यशाबद्दल एल.जी. शिक्षण संकुल, काटी व शेळगाव परिसरातील नागरिक, शिक्षक व पालक वर्गातून तिचे अभिनंदन होत आहे. विविध सामाजिक संघटना व मान्यवरांकडून तिचा सत्कारही करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments