Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मेघांची हुलकावणी आणि कोरड्या वाऱ्याचा तडाखा; काटी परिसरात खरिपाचा पेरा खोळंबला; मशागत आटोपूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत; आधीच पेरणी केलेल्यांवर दुबार पेरणीचे संकट

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आषाढातही पावसाने पाठ फिरवल्याने तुळजापूर तालुक्यातील काटीसह सावरगाव,दहिवडी,खुंटेवाडी,वाणेवाडी  परिसरात खरिपाचा हंगाम पुरता संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहणाऱ्या तीव्र, कोरड्या वाऱ्यामुळे जमिनीतील आर्द्रता कमालीची घटली असून, खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात लांबल्या आहेत. आधीच खतांच्या आणि बियाण्यांच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता हवालदिल झाला आहे.

आभाळाकडे नजरा; महागडी बियाणे घरातच
यंदाचा मान्सून वेळेवर दाखल होईल या आशेवर शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीस शेतीची मशागत, नांगरणी व वखरणीची कामे वेळेत आटोपून ठेवली होती. बाजारातून महागडी संकरित बियाणे आणि खतांची खरेदी करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र, जून महिन्यापासून अद्यापपर्यंत परिसरात एकदाही समाधानकारक पाऊस झालेला नाही. दिवसा ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची चिन्हे दिसतात; मात्र वेगवान वाऱ्यामुळे हे ढग बरसण्यापूर्वीच वाहून जात आहेत. निसर्गाच्या या ‘लपंडावा’मुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.

घाई नडणार? दुबार पेरणीची टांगती तलवार
परिसरातील काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसाच्या भरवशावर घाईघाईने पेरण्या उरकून घेतल्या होत्या. परंतु, त्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने आणि कडक ऊन व कोरड्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. परिणामी, पेरलेले बियाणे मातीतच सडण्याची किंवा अंकुरलेले कोंब जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अंकुरण क्षमता धोक्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांवर आता 'दुबार पेरणी'ची आर्थिक कुऱ्हाड कोसळण्याचे संकट गडद झाले असून, पुन्हा बियाणे खरेदी कुठून करायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

कृषी विभागाचा सावधगिरीचा सल्ला
"शेतकऱ्यांनी घाईघाईत कोरड्या किंवा पुरेशा ओलाव्याशिवाय जमिनीमध्ये पेरणी करू नये. किमान ७५ ते १०० मिमी इतका समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा बियाणे वाया जाण्याची शक्यता दाट असते."
— आनंद पाटील, उप कृषी अधिकारी काटी मंडळ 

उत्पादनात घट होण्याची धास्ती
पेरणीचा मुख्य कालावधी  टळून चालल्यामुळे पिकाच्या वाढीवर आणि पर्यायाने अंतिम उत्पादनावर याचा थेट विपरीत परिणाम होणार आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन यांसारख्या पिकांचा पेरा वेळेत न झाल्यास त्याचा उतारा घटतो, असा आजवरचा अनुभव आहे. सद्यस्थितीत हवामान बदल आणि विस्कळीत झालेले पावसाचे चक्र यामुळे काटी परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्था चिंतेच्या गर्तेत सापडली असून, आता केवळ दमदार आणि सलग पावसाचे पुनरागमनच बळीराजाला दिलासा देऊ शकते.

Post a Comment

0 Comments