'Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
दरवर्षी ३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर, त्या आधारे अनुज्ञेय पदांपेक्षा अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तुळजापूर तालुक्यात अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली. सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे हे समायोजन तालुकास्तरावर पंचायत समितीच्या सभागृहात समुपदेशन (काउन्सिलिंग) पद्धतीने करण्यात आले.
शासन निर्णय दिनांक १२ मे २०११ मधील तरतुदींनुसार या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या अंतर्गत तालुक्यातील अतिरिक्त ठरलेल्या एकूण १९ शिक्षकांचे तालुकास्तरावर यशस्वी समायोजन करण्यात आले. यामध्ये भाषा विषयाचे ९ पदवीधर शिक्षक, विज्ञान दर्जावाढ २ शिक्षक, सहशिक्षक ६ आणि सामाजिक शास्त्रे विषयाच्या २ पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, सामाजिक शास्त्र विषयाच्या एकूण ८ पदवीधर शिक्षकांपैकी ६ शिक्षकांना तालुक्यात रिक्त जागा उपलब्ध नसल्यामुळे, पुढील समायोजनासाठी जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रक्रियेच्या वेळी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी काळे, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ काळे तसेच निरीक्षक म्हणून विस्तार अधिकारी श्रीमती सविता कुंभार व विस्तार अधिकारी नागनाथ जट्टे प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा गौरव
अत्यंत संवेदनशील मानली जाणारी ही समायोजन प्रक्रिया कोणत्याही वादाशिवाय, पूर्णतः पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविल्याबद्दल शिक्षक संघटना व उपस्थितांच्या वतीने प्रशासनाचे विशेष कौतुक करण्यात आले. या यशस्वी आयोजनाबद्दल सभापती विक्रमसिंह देशमुख, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी काळे, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ काळे व विस्तार अधिकारी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभास ज्येष्ठ शिक्षक नेते लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, बाळासाहेब घेवारे यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मोहन भोसले, हुंडेकरी, शिवाजी साखरे आणि तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"शिक्षकांचे समायोजन ही अत्यंत संवेदनशील आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाची प्रक्रिया
"शिक्षकांचे समायोजन ही अत्यंत संवेदनशील आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाची प्रक्रिया असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांवरही अन्याय होऊ नये, हा सुवर्णमध्य साधून आम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. अत्यंत पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे तालुक्यातील शैक्षणिक घडी अधिक मजबूत होईल, असा मला विश्वास आहे."
----श्री. विक्रमसिंह देशमुख सभापती, पंचायत समिती, तुळजापूर
------------------------
"शासन निर्णयातील (GR) सर्व निकष आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन
"शासन निर्णयातील (GR) सर्व निकष आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करून ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली आहे. समुपदेशन (काउन्सिलिंग) पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शिक्षकांमध्ये कोणताही संभ्रम राहिला नाही आणि अत्यंत विनावाद व पारदर्शक वातावरणात १९ शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले. प्रशासकीय अचूकता आणि शिक्षक संघटनांचे सहकार्य यांमुळेच हे नियोजन यशस्वी ठरले."
---श्री. हेमंत भिंगारदिवे गटविकास अधिकारी - BDO, पंचायत समिती तुळजापूर
0 Comments