'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर आंतरजिल्हा जोड रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्याची अक्षरशः 'चाळण' झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या अथांग खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. रोज जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिम्म कारभाराविरुद्ध नागरिक व वाहनधारकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सोलापूरशी संपर्क जोडणारा प्रमुख दुवा निष्प्रभ
काटी, सावरगाव, केमवाडी आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सोलापूर शहरात जाण्यासाठी हा रस्ता अतिशय सोयीचा व जवळचा मार्ग आहे. याव्यतिरिक्त, वडाळा येथील विविध शाळा, महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये दैनंदिन शिक्षणासाठी जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना याच खडतर मार्गावरून प्रवास करावा लागतो. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची झालेली दुरवस्था आणि डांबराचा मागमूसही उरला नसल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. धुळीचे साम्राज्य आणि खड्ड्यांमधील साचलेले पाणी यामुळे दुचाकीस्वारांचे घसरून पडण्याचे प्रकार नित्यनियमाचे झाले आहेत.
काटेरी झाडींमुळे रस्ता झाला अरुंद
रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या गंभीर असतानाच, या १२ किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर बाबूळ आणि काटेरी झाडी-झुडपे वाढली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली असून, समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज बांधणे कठीण जाते. वळणावर समोरासमोर येणाऱ्या वाहनांना जागा देताना चालकांची मोठी कसरत होते. अनेकदा या काटेरी झुडपांमुळे वाहनांचे नुकसान होतेच, शिवाय वाहनधारकांच्या अंगावर ओरखडे उठून दुखापत होण्याचे प्रसंग घडत आहेत.
प्रशासकीय अनास्था की मोठ्या अपघाताची प्रतीक्षा?
स्थानिक नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि डांबरीकरणासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने दिली, पाठपुरावा केला; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालवले आहे. अवजड वाहतूक आणि पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रशासनाला एखाद्या मोठ्या प्राणघातक अपघाताची प्रतीक्षा आहे का? असा उद्विग्न सवाल आता स्थानिक ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
"प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा!"
"सावरगाव ते वडाळा रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वाहनधारकांचे कंबरडे मोडले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी आणि निवेदने देऊनही बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण व डांबरीकरण करावे, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल."
— मनोज मोहिते, वडाळा (स्थानिक नागरिक / सामाजिक कार्यकर्ते)
0 Comments