'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान शिक्षण अधिक रंजक बनावे, या उद्देशाने काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेत 'सुहाना' फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. प्रवीण मसालेवाले ट्रस्ट (पुणे) आणि ज्ञान प्रबोधिनी (हराळी केंद्र, धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात इयत्ता आठवी ते दहावीतील एकुण २३६ विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. फिरत्या प्रयोगशाळेतील विविध वैज्ञानिक उपकरणे आणि प्रत्यक्ष प्रयोगांची प्रात्यक्षिके पाहून विद्यार्थिनींनी विज्ञानातील कठीण संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतल्या. प्रयोगांमागील वैज्ञानिक तत्त्वे रंजकपणे समजावून सांगितल्यामुळे विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा शमवून घेतली.
"अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनच निर्माण होत नाही, तर प्रयोगशील वृत्ती आणि संशोधनाची ओढ विकसित होण्यास मोठी मदत होते."
— श्री. किशोर बनसोडे (मुख्याध्यापक, येडेश्वरी कन्या प्रशाला)
हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. गणेश गुंगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
0 Comments