तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील सुरक्षा आणि हाऊसकीपिंग व्यवस्थेमध्ये सुरू असलेला मोठा गैरव्यवहार अखेर चव्हाट्यावर आला आहे. मंदिर प्रशासनातील काही कर्मचारी आणि खाजगी सुरक्षा रक्षक यांच्या संगनमताने 'व्हीआयपी' गेटमधून बेकायदेशीरपणे भाविकांना प्रवेश दिला जात असल्याचा गंभीर आरोप तुळजापूर येथील नगरसेवकांनी केला आहे. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्रजी तामोरे यांना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने थेट लेखी निवेदन सादर करत चौकशीची मागणी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

बायोमेट्रिक हजेरी गायब? नियमावलीवर प्रश्नचिन्ह
तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून सुरक्षा आणि हाऊसकीपिंगचे कंत्राट खाजगी कंपन्यांना (BVG व SISPL) देण्यात आले आहे. मात्र, मंदिरात नेमके किती सुरक्षा रक्षक आणि हाऊसकीपिंग कर्मचारी कार्यरत आहेत? त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निविदेतील अटींनुसार सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात अशी हजेरी घेतली जाते का, असा थेट सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्यप्रत (Report) जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

पैसे घेऊन 'व्हीआयपी' दर्शन; व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध!
निवेदनात करण्यात आलेला सर्वात खळबळजनक आरोप म्हणजे, सुरक्षा कंपनीचे सुपरवायझर, काही कर्मचारी आणि काही बोगस पुजारी यांच्या संगनमताने मंदिरात सर्रास आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे. 'व्हीआयपी' गेटमधून पैशांच्या मोबदल्यात भाविकांना नियमबाह्य पद्धतीने थेट दर्शन दिले जात आहे. या धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ क्लिप्स आणि फुटेज पुरावे म्हणून उपलब्ध असल्याचा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे. या गैरप्रकारामुळे तासनतास दर्शन मंडपात रांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

देवस्थानची बदनामी; कारवाईची मागणी
काही भ्रष्ट कर्मचारी आणि पुजाऱ्यांमुळे संपूर्ण देवस्थान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नाहक बदनामी होत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी तात्काळ गांभीर्याने विचार करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन देताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, तुळजापूरचे नगरसेवक अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय परमेश्वर आणि प्रगती गोपाळ लोंढे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.