Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?' सोलापूर-धाराशिव सरहद्दीवरील जळकोटवाडी-वडगाव रस्त्याची दुरवस्था!दहा-पंधरा वर्षांपासून डागडुजी नाही; एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल; अर्धवट वीजवाहिनीमुळे अपघाताचे सावट

'

' Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी / उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सोलापूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेला सावरगाव ते जळकोटवाडी - वडगाव (काटी)- नरुटेवाडी हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता सध्या प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरला आहे. गेल्या १५ वर्षांत या रस्त्याची कोणतीही डागडुजी न झाल्याने येथे 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता' अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरील हक्काची बससेवा बंद झाली असून, याचा फटका शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य प्रवाशांना बसत आहे. पावसाळ्यात तर हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघातांची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

मुख्य प्रवाहापासून तुटलेला सीमावर्ती भाग
सावरगाव, जळकोटवाडी, वडगाव (काटी), नरुटेवाडी या गावांसाठी सोलापूरला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा (शॉर्टकट) मार्ग आहे. प्रसिद्ध भक्तीस्थान असलेल्या मार्डी येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी येणारे हजारो भाविक आणि नवदांपत्य याच मार्गाचा वापर करतात. पूर्वी या मार्गावरून 'धाराशिव ते सोलापूर' अशी नियमित बससेवा सुरू होती. मात्र, रस्त्याची चाळण झाल्याचे कारण पुढे करत ही बस फेरी बंद करण्यात आली आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना खाजगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागत आहे.

काटेरी झुडपे आणि साचलेले पाणी: अपघातांचे सत्र
रस्त्यावर प्रचंड खड्डे तर आहेतच, सोबतीला रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून खोलीचा अंदाज येत नाही. वाहनधारकांना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे.

लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचे दुर्लक्ष?
विशेष म्हणजे, याच रस्त्यावरून अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेहमीच ये-जा असते. असे असूनही या रस्त्याची दयनीय अवस्था त्यांच्या नजरेस पडत नाही का? की पाहूनही डोळेझाक केली जाते? असा दबका सूर प्रवाशांमधून उमटत आहे. या सीमावर्ती आणि ग्रामीण भागाला प्रशासनाने वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


विद्युत पुरवठ्याचा प्रश्नही रेंगाळला; दोन वर्षांपासून काम रखडले
रस्त्याच्या समस्येसोबतच या भागातील वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. जळकोटवाडी व वडगाव (काटी) गावांवरील जुन्या वीजवाहिनीचा भार कमी करण्यासाठी सावरगाव ते वडगाव दरम्यान नवीन विद्युत पुरवठ्यासाठी पोल उभारून स्वतंत्र लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे काम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. हलक्या दर्जाच्या कामामुळे जुजबी वादळी वारा सुटला तरी हे पोल उन्मळून पडत आहेत. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"सावरगाव ते जळकोटवाडी-वडगाव (काटी)-नरुटेवाडी या रस्त्याची झालेली दुरवस्था द्राक्ष बागायतदार आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक कंबरडे मोडणारी ठरत आहे. खड्ड्यांमुळे शेतीमाल वेळेत बाजारात पोहोचवणे अशक्य झाले आहे. त्यातच, जळकोटवाडी व वडगाव परिसरासाठी स्वतंत्र वीज लाईनचे काम दोन वर्षांपासून रेंगाळले आहे. उभे केलेले पोल वादळाने पडून राहतात, यामुळे शेतीला आणि गावांना सुरळीत वीज मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणने तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करावे आणि पोल उभारणीचे काम पूर्ण करून स्वतंत्र लाईन कार्यान्वित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल."
—  > संतप्त ग्रामस्थ, जळकोटवाडी)

Post a Comment

0 Comments