काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या जनावरांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या टोळीचा पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून चोरीच्या म्हशी आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
अशी केली कारवाई
माहे डिसेंबर 2025 मध्ये तामलवाडी परिसरातून जनावरे चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोन इसमांकडे सखोल विचारपूस केली असता, त्यांनी नांदुरी येथून तीन म्हशी चोरल्याची कबुली दिली.
आरोपी आणि जप्त मुद्देमाल
अजीम निजाम सय्यद (रा. सावरगाव, जि. धाराशिव): या मुख्य आरोपीकडून दोन म्हशी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सोहेल साजिद कुरेशी (रा. लातूर): याला चोरीची म्हैस विकत घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून म्हैस विक्रीची रक्कम जप्त केली आहे.निलेश नागनाथ तानवडे (रा. सावरगाव): चोरीच्या जनावरांची वाहतूक करण्यासाठी स्वतःच्या वाहनाचा वापर केल्यामुळे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
तपास पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, हवालदार तोगे, जुबेर काझी, पोलीस अंमलदार सुरज नरवडे, गोपाळ सलगर, गायकवाड, शेख आणि नितीन भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढील तपास तामलवाडी पोलीस करत असून या टोळीकडून जनावरे चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments