धाराशिव :धाराशिव तालुक्यातील येडशी जिल्हा परिषद गटात राजकीय रंगत कमालीची वाढली असून, या ठिकाणी भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सरळ दुरंगी लढत होत आहे. दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असली तरी, ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार उद्योजक देवदत्त मोरे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
जिल्हा परिषदेच्या दुरंगी लढाई ठाकरे सेनेची प्रचारात आघाडी
येडशी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये ठाकरे सेनेने तगडे उमेदवार दिले आहेत.येडशी पंचायत समिती गणात नीता गजानन नलावडे तर कसबे तडवळे पंचायत समिती गणात बालाजी मनके या उमेदवारांच्या प्रचारामुळे संपूर्ण गटात 'मशाल' चिन्हाचा प्रभाव दिसून येत असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या गटात एकही अपक्ष उमेदवार रिंगणात नसल्याने ही लढाई थेट पक्षीय वर्चस्वाची ठरणार आहे.
खासदार ओमराजे निंबाळकरांची आज तोफ धडकणार
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची आज, सोमवार दि. 2 रोजी सायंकाळी 7 वाजता येडशी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत खासदार काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
देवदत्त मोरे यांच्या सामाजिक कामांची चर्चा:
उद्योजक देवदत्त मोरे यांनी मतदार संघात केलेली सामाजिक कामे त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार ठरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने धार्मिक कार्य: श्री क्षेत्र रामलिंग देवस्थानचे शिखर व सुवर्ण कळस, मन्मथ स्वामी मंदिर, खंडोबा मंदिर आणि जवळा येथील हनुमान मंदिरासाठी मोठी आर्थिक मदत.जलसंधारण: 2017 मध्ये कसबे तडवळे येथे 9 कि.मी. लांबीची जलयुक्त शिवाराची कामे, शिक्षण व आरोग्य: जिल्हा परिषद शाळेला 6 संगणक संच भेट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम निर्मिती.
सर्वधर्मसमभाव: हजरत भैरुल्ला कादरी दर्गा सुशोभीकरण आणि मुस्लिम समाज दफनभूमीसाठी दिलेले योगदान.
वर्चस्वाची लढाई
नगरपंचायत आणि पालिकेत शहरी मतदारांनी महायुतीला साथ दिली असली, तरी ग्रामीण भागात आपले वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे सेनेने कंबर कसली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
"खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे येडशी गटात शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे."
- सुभाष धनके, कसबे तडवळे,शिवसेना (उबाठा)
0 Comments