धाराशिव: "आम्ही आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवतो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे हीच आमची पावती असून, विकासाच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत," अशी ठाम भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मांडली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर, धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे शिवसेना (उबाठा) व काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'संवाद सभेत' ते बोलत होते.
यावेळी खासदार निंबाळकर यांनी परिसरात राबविण्यात आलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला. ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि महिला-युवकांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ही सभा येडशी जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. देवदत्त भागवत मोरे व श्री. बालाजी अंबऋषी मनके यांच्या प्रचारार्थ पार पडली. यावेळी उमेदवारांनीही जनतेशी संवाद साधून प्रामाणिक सेवा देण्याची ग्वाही दिली. या सभेला शिवसैनिकांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
0 Comments