मुरूम /प्रतिनिधी
भारताला जगात महासत्ता बनवायचे असेल तर युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला पाहिजे. शिकणे, सेवा करणे आणि पुढे नेणे हीच तरुणांची त्रिसूत्री असून अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
समाजसेवा ही व्यक्तिमत्व विकासाचा पाया असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी केले.
मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने भुसणी, ता. उमरगा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शाश्वत विकासासाठी युवक विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी बुधवारी (ता. २१) रोजी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य डॉ. सादक वली, उपसरपंच दशरथ मंडले, श्रीमंत पाटील, सुभाष बिराजदार, राजेंद्र व्हनाजे, महादेव संगशेट्टी, महादेव व्हनाजे, महादेव पाटील, गुलाब हिरमुखे, मुख्याध्यापक प्रेमनाथ आपचे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस डॉ. गरुड यांनी पुष्पहार घालून अभिवादन करून कुदळ मारून उद्घाटन करण्यात आले.
डॉ. गरुड पुढे बोलताना म्हणाले की, आज युवकांमध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास, वाढती स्पर्धात्मकता, बेरोजगारीमुळे तणावग्रस्त जीवन, वाढती व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिरेकी वापर, अंधश्रद्धा या पार्श्वभूमीवर शिक्षणाकडे वस्तुनिष्ठ व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. आज विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असताना त्यांनी शिक्षणाबरोबरच मैत्रीपूर्ण जिव्हाळा निर्माण करावा. शिक्षणामुळे माणूस बौद्धिक दृष्ट्या सक्षम आणि प्रगल्भ बनतो, त्यामुळे जीवनमान सुधारते. संत गाडगेबाबा यांच्या कार्याची महती सांगताना भस्म, बुवा, जादूटोणा यांचा आता करूया त्याग. शिक्षण, विज्ञान आणि विवेक हाच समाजाचा बनवूया भाग असे ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिबिराच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शीला स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. कार्यक्रमास गावातील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
भुसणी, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराप्रसंगी डॉ. दिलीप गरुड उद्घाटक म्हणून बोलताना अशोक सपाटे, दशरथ मंडले, सादक वली, चंद्रकांत बिराजदार व अन्य.
0 Comments