काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत राजकीय हालचालींना वेग आला असून, मंगळवारी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले.
भाजपची मोर्चेबांधणी
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याचे नियोजन केले आहे,काटी जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित जागा असून मंगळवारी काटी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून आशा बाळासाहेब भाले, चैत्राली सिध्दनाथ ढगे,प्रभावती रामहरी थोरबोले,अलका बळीराम बनसोडे,मिरा प्रताप ढगे सावरगाव मधून प्रतिभा शंभर राऊत यांनी जिल्हा परिषदेसाठी प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. तसेच,काटी पंचायत समिती गण सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित असून या गणात भाजपकडून मकरंद देशमुख महादेव जाधव,अनिल गुंड या प्रमुख तीन उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच काटी पंचायत समिती गणातून अमोल मनोहर देशमुख यांनीही अपक्ष म्हणून आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
"गेल्या पाच वर्षांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली विकासकामे आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत.याच जोरावर आम्ही उमेदवारांनी अर्ज भरले असून, जनता आम्हालाच कौल देईल असा विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,भाजपचे विद्यमान तालुकाध्यक्ष महादेव जाधव,कार्यकर्ते मकरंद देशमुख यांनी व्यक्त केला." —
सावरगाव पंचायत समिती गणात यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल
सावरगाव पंचायत समिती गणातून माजी सभापती संतोष बोबडे व भाजपचे कार्यकर्ते रोहित पाटील यांनी भाजपकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे शंकर (तात्या) शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महाविकास आघाडीचे उत्तर....
दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही सावध पवित्रा घेत तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी अर्चना भैरी काळे,पुनम गौरीशंकर कोडगिरे दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले,तर पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे माजी चेअरमन सयाजीराव विजयसिंह देशमुख व सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्षपद तथा विद्यमान सरपंच पती सुजित हंगरगेकर हे शिवसेना (उबाठा) पक्षाकडून आपली उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केले आहेत.ही निवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या समन्वयाने लढवली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया
"स्थानिक प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष आणि वाढती महागाई याला जनता कंटाळली आहे.आम्ही कॉंग्रेस, शिवसेना (यूबीटी) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकजुटीने ही निवडणूक लढवत असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल. असा ठाम विश्वास सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुजित हंगरगेकर, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर (आबा) तोडकरी, प्रदीप साळुंके यांनी व्यक्त केला."
राजकीय वातावरण तापले
दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपले पत्ते खोलल्यामुळे आता लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीने (शिवसेना-यूबीटी, राष्ट्रवादी-शरद पवार गट आणि काँग्रेस) एकजुटीने भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही बाजूंनी अर्ज दाखल झाले असले तरी,पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म कोणाला मिळणार आणि कोण माघार घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 27 जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार उरतात आणि प्रचाराची धुरा कोण कशी सांभळते,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी या काटी जिल्हा परिषद गटात काँग्रेस,शेकाप, व राष्ट्रवादी, तसेच यापुर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप या राजकीय पक्षांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीत भाजप गड अबाधित ठेवणार की महाविकास आघाडी ही जागा खेचून आणणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
काटी व सावरगाव पंचायत समिती गणात या गावांचा समावेश
काटी पंचायत समिती अंतर्गत काटी, झोपडपट्टी, वाणेवाडी,काटी तांडा,नरसिंह तांडा,सावंतवाडी 1, सावंतवाडी 2, दहिवडी, पांगरदरवाडी गावांचा समावेश आहे. तर सावरगाव पंचायत समिती अंतर्गत सावरगाव, गंजेवाडी, जळकोटवाडी (सा), गवळेवाडी,केमवाडी, वडगाव (काटी),पारधे वस्ती गावांचा समावेश आहे.
काटी पंचायत समिती गणात मतदार....
5512 पुरुष 5031 स्री मतदार असे एकूण 10543 मतदार आहेत. तर सावरगाव पंचायत समिती गणात
5988 पुरुष,व 5355 स्री मतदार असे एकूण 11343 मतदार आहेत. जिल्हा परिषद गटात एकूण 11 गावांचा समावेश असून काटी जिल्हा परिषद गटात एकूण 21886 मतदार आहेत. काटी जिल्हा परिषद गटात एकूण 28 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
निवडणूक वेळापत्रक 2026
नामनिर्देशन पत्र अर्ज स्वीकारणे 16 ते 21 जानेवारी 2026
नामनिर्देशनपत्रांची छाननी 22 जानेवारी 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 27 जानेवारी 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत)
निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 (सायंकाळी 5 नंतर)
मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 (सकाळी 7:30 ते 5:30)
मतमोजणी आणि निकाल 7 फेब्रुवारी 2026
0 Comments