मुरुम/प्रतिनिधी
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट अर्जुन पाचंगे याने आपल्या अष्टपैलू कौशल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे झालेल्या 'गणतंत्र दिवस परेड' (RD Camp) साठी महाराष्ट्राच्या संघात 'संबळ' या कला प्रकारासाठी अर्जुनची निवड झाली होती.
या ऐतिहासिक कामगिरीसोबतच, अर्जुनची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'युथ एक्सचेंज प्रोग्राम' (YEP) साठी देखील भारतीय संघात सांस्कृतिक वादन आणि गीत प्रकारात निवड झाली आहे. या दुहेरी यशाबद्दल ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण, कर्नल वाय. बी. सिंह आणि कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांच्या हस्ते अर्जुनचा विशेष सत्कार करण्यात आला.
कॅडेट्सनी ध्येयवादी बनावे: कर्नल संतोष नवगण
सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नवगण म्हणाले की,कॅडेट्सनी एनसीसीच्या माध्यमातून आपले भवितव्य घडवून देश व समाजाची सेवा करावी आणि एनसीसीच्या तीन वर्षांच्या कालावधीत वेळेचा सदुपयोग करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे ध्येय गाठावे. त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी 'अष्टपैलू व्यक्तिमत्व' बनणे आवश्यक आहे.
या सोहळ्याला ॲडम ऑफिसर कर्नल वाय. बी. सिंह, कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, बाजीराव पाटील, संजय चिकने यांच्यासह आर्मी स्टाफ आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्जुनच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
0 Comments