तुळजापूर/उमाजी गायकवाड
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यंदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ जिल्हा परिषद गटातून समाजवादी पार्टीने विजय मिळवत महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात आपले खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या कन्या सिमाताई माडजे-रोचकरी आणि पुत्र कृष्णा भैय्या रोचकरी यांनी एकाच वेळी विजय मिळवून राजकारणात आपला दबदबा निर्माण केला आहे.
जल्लोष साजरा करताना माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी, कृष्णा (भैय्या) रोचकरी, तालुकाध्यक्ष राहुल जाधव,ॲड.उदय भोसले आदी कार्यकर्ते
तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या राजकीय अनुभवाचा आणि दांडग्या जनसंपर्काचा फायदा या निवडणुकीत दिसून आला. आपल्या दोन्ही मुलांच्या रूपाने त्यांनी मतदारसंघात नव्या नेतृत्वाची पेरणी यशस्वीपणे केली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे."
बहीण-भावाची विजयाची गुढी
मंगरुळ जिल्हा परिषद गटातून समाजवादी पार्टीच्या अधिकृत उमेदवार सिमाताई माडजे-रोचकरी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. त्याचबरोबर, याच गटांतर्गत येणाऱ्या अरळी पंचायत समिती गणातून त्यांचे सख्खे भाऊ कृष्णा (भैय्या) देवानंद रोचकरी हे देखील विजयी झाले आहेत. एकाच कुटुंबातील दोन तरुण उमेदवारांनी थेट निवडणुकीत यश मिळवल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
समाजवादी पार्टीचे जिल्ह्यात पहिले पाऊल
आतापर्यंत धाराशिवच्या राजकारणात प्रस्थापित पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, देवानंद रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली मंगरुळ गटात समाजवादी पार्टीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क या जोरावर रोचकरी कुटुंबाने मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.
गुलालाची उधळण अन् जल्लोष
विजय जाहीर होताच देवराज मित्र मंडळ, कृष्णा भैय्या रोचकरी मित्र मंडळातील कार्यकर्ते, व मंगरुळ जिल्हा परिषद गटातील समाजवादी पार्टीचे कार्यकर्त्यांनी व मतदारांनी एकच जल्लोष केला. "देवानंद रोचकरी साहेब आगे बढो", "समाजवादी पार्टीचा विजय असो" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत मंगरुळ आणि तुळजापूर परिसरातून विजयोत्सव साजरा केला.
नवनिर्वाचित सदस्या सौ.सिमाताई माडजे-रोचकरी मंगरुळ जिल्हा परिषद गट
हा विजय मंगरुळ गटातील जनतेचा व कार्यकर्त्यांचा
"हा विजय मंगरुळ गटातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा विजय आहे. जनतेने जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता गटाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल."
हा विजय मंगरुळ गटातील प्रत्येक माता-भगिनीचा आणि कष्टकरी जनतेचा आहे. माझ्या वडिलांनी (देवानंद रोचकरी) आम्हाला समाजसेवेची शिकवण दिली, त्याच वाटेवर चालत आम्ही या भागाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जनतेने दिलेला हा कौल विकासासाठी दिलेला आशीर्वाद आहे."
— नवनिर्वाचित सिमाताई माडजे-रोचकरी विजयी उमेदवार, समाजवादी पार्टी, मंगरुळ जिल्हा परिषद गट
समाजवादी पार्टी अरळी पंचायत समिती गण
तरुणांच्या हाताला काम हाच माझा अजेंडा
"तरुणांच्या हाताला काम आणि सामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. मंगरुळ गट आणि अरळी गणाने जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवू. ही तर केवळ सुरुवात आहे, आगामी काळात समाजवादी विचारांच्या माध्यमातून आम्ही जनसेवेचा नवा आदर्श उभा करू."
--कृष्णा भैय्या देवानंद रोचकरी
नवनिर्वाचित पंचायत समिती अरळी गण
0 Comments