काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काटगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात काटगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीने बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर तामलवाडी पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अनपेक्षित विजय मिळवत 'मशाल' पेटवली आहे.
काटगावमध्ये भाजपचा वरचष्मा
७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी (दि. ९) करण्यात आली. काटगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे निवृत्ती माळी यांनी विजय मिळवला, तर काटगाव पंचायत समिती गणातून भाजपच्याच भाग्यश्री शिंदे विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे काटगाव परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
तामलवाडीत मशाल धगधगली; भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका?
सर्वात लक्षवेधी लढत तामलवाडी पंचायत समिती गणात पाहायला मिळाली. येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या सौ. संगीता जगन्नाथ गवळी यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांच्या पत्नी सौ. उषा शिंदे आणि भाजपच्या सौ. मंदाकिनी शिवाजी सावंत यांचा पराभव केला.
माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवली होती. मात्र, त्यांच्या प्रवेशापासूनच स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी या पराभवाचे मुख्य कारण ठरल्याची चर्चा आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे पारडे जड मानले जात होते, मात्र अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसला नियोजनाचा अभाव नडला
दुसरीकडे, महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने दोन स्वतंत्र उमेदवार मैदानात होते. मतविभाजनाचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, काँग्रेस पक्षाने दिलेली उमेदवारी आणि प्रचारादरम्यान उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यामुळे काँग्रेसला या गणात सपशेल पराभव पत्करावा लागला.
जनतेचा कौल आणि चर्चेचे पेव
एकीकडे 'धनशक्ती'चा वापर झाल्याची चर्चा असताना, जगन्नाथ गवळी यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार करत आणि भाजपमधील बंडाळीचा फायदा घेत आपल्या उमेदवाराला विजयी केले. तामलवाडी गणात भाजपचा दबदबा आणि दिग्गज नेत्यांची साथ असतानाही झालेला हा पराभव नेमका कोणामुळे, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
काटगाव जिल्हा परिषद गटातील विजयी शिलेदार
काटगाव जि.प.: निवृत्ती माळी (भाजप) विजयी.
काटगाव प.स. गण: भाग्यश्री शिंदे (भाजप) विजयी.
तामलवाडी प.स. गण: संगीता जगन्नाथ गवळी (शिवसेना - उबाठा) विजयी
0 Comments