तुळजापूर/उमाजी गायकवाड
श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पावन नगरीचे उपनगराध्यक्ष रामचंद्र (आबा) रोचकरी यांनी आज मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी तुळजापूर नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला.
नगराध्यक्ष विनोद गंगणे हे वैयक्तिक कारणास्तव रजेवर गेल्याने, नगरपालिकेच्या नियमानुसार ही जबाबदारी रोचकरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पालिकेच्या कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात मावळते नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या उपस्थितीत हा पदभार हस्तांतरित करण्यात आला.
यावेळी रामचंद्र रोचकरी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. "प्रशासकीय बदल हा तात्पुरता असला तरी शहराच्या विकासकामांची गती मंदावू देणार नाही," अशी ग्वाही प्रभारी नगराध्यक्ष रामचंद्र (आबा) रोचकरी यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना दिली. याप्रसंगी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तुळजाई नगरीच्या सेवेची संधी मिळणे हे माझे भाग्य
तुळजाई नगरीच्या सेवेची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. विनोद ( पिटू) भैय्या गंगणे यांच्या रजेच्या काळात नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना सर्व नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन शहराच्या हिताचे निर्णय घेण्यावर माझा भर असेल. विकासाची गती कायम राखण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पदभार तात्पुरता असला तरी, तुळजापूर शहरातील सुरू असलेली विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याला माझे प्राधान्य राहील. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून शहराच्या स्वच्छतेकडे आणि मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले जाईल." — रामचंद्र रोचकरी (प्रभारी नगराध्यक्ष, तुळजापूर)
0 Comments