काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील 'एस.ई.एफ.डी.एल.ए.' (SEFDLA) कार्ड चोरी प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशातील एका आरोपीला बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या आरोपीने मराठवाड्यात अशाच प्रकारचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
नेमकी घटना काय?
तामलवाडी येथील एअरटेल टॉवरवरून ७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या महागड्या कार्ड प्लेट्स चोरल्या होत्या. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सपोनि गोकुळ ठाकूर यांनी सहकाऱ्यांसह या प्रकरणाचा तपास सुरू केला.
चोरीची मोडस ऑपरेंडी (पद्धत)
ध्रुव त्रिभुवन प्रसाद (वय २५, रा. भागदिवा ग्राम, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) आणि त्याचा साथीदार हे बनावट आधार कार्ड व लायसन्स सादर करून मोठ्या शहरांमधून भाड्याने गाड्या घेत असत. दिवसभर शहरात फिरून मोबाईल टॉवर कुठे आहेत याची रेकी करायची आणि रात्रीच्या वेळी टॉवरमधील महागड्या प्लेट्सची चोरी करायची, अशी त्यांची पद्धत होती.
अशी झाली अटक
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि साहित्य पोलिसांनी आधीच जप्त केले होते. दरम्यान, आरोपी पुन्हा महाराष्ट्रात येणार असून मोठे गुन्हे करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. आरोपी वैराग-गौडगाव मार्गे बेंबळी पोलीस स्टेशनच्या देवळाली शिवारात आला असता, पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर, पीएसआय प्रदीप टेकाळे, संजय कलमदाने, सुरज नरवडे, नितीन भोसले आणि पोलीस मित्र अमोल पाटील यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
0 Comments