काटी:📍 ओन्ली न्यूज धाराशिव अपडेट!
सहशिक्षक पंकज काटकर, मराठी राजभाषा दिनानिमित्त यांनी अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण लेख लिहिला आहे.
अमृताशी पैजा जिंकणारी... माझी मायमराठी! हा लेख सविस्तर वाचा....
२७ फेब्रुवारी! थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हा दिवस संपूर्ण जगभरात 'मराठी राजभाषा गौरव दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. "माझा मराठाचि बोलु कौतुकें। परी अमृतातेही पैजा जिंके।।" असे मराठीचे कौतुक संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. 'जे जे वांछील, ते ते लाहो' असे म्हणण्याचे सामर्थ्य केवळ मराठीतच आहे. विश्वबंधुतेचे 'पसायदान' ज्ञानेश्वरांनी मराठीतच गायले, कारण वैश्विक बंधुता निर्माण करण्याची ताकद या भाषेत आहे.
मराठीचा ऐतिहासिक प्रवास
अकराव्या शतकात महानुभाव पंथाचे वाङ्मय मराठीत निर्माण झाले. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी या भाषेला अधिक सामर्थ्यवान केले. पुढे सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे महत्त्व ओळखून 'राज्यव्यवहार कोश' तयार केला. स्वराज्याची राजमुद्राही मराठीतच कोरली गेली— "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". मराठी भाषा अतिशय प्राचीन आहे. काळाच्या ओघात तिच्यावर अनेक आक्रमणे झाली, अनेक बदल झाले, पण माझी मायमराठी नेहमीच 'नित्यनूतन' राहिली.
बोलीभाषेचे अलोट वैभव
मराठीच्या विविध बोलींनी या भाषेचे दालन समृद्ध केले आहे. विदर्भाची 'वऱ्हाडी', कोकणची 'कोकणी', पश्चिम महाराष्ट्राची रांगडी भाषा, खानदेशी आणि मराठवाड्याची 'मराठवाडी'... किती म्हणून नावे सांगावीत! मुंबईची 'टपोरी' असो, पुण्याची 'प्रमाणबद्ध' असो, कोल्हापूरची 'झणझणीत' असो वा साताऱ्याची 'रगेल' भाषा; प्रत्येक प्रांतानुसार मराठीचा साज बदलतो. सोलापूरच्या मराठीवर कन्नड-तेलगूचा प्रभाव एक वेगळाच ठसा उमटवतो, तर धाराशिव आणि लातूरची बोली मातृस्पर्शाचा जिव्हाळा आणि ओलावा देते.
साहित्याचा हिमालय
मराठी साहित्याने भाषेची उंची हिमालयासारखी वाढवली आहे. खाडिलकर, दांडेकर, तेंडुलकर, आचार्य अत्रे, गडकरी, सबनीस, पु. ल. देशपांडे यांसारख्या प्रतिभावान नाटककारांनी मराठी वाचकवर्ग समृद्ध केला. विं. दा. करंदीकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, बापट, गोविंदाग्रज, केशवसुत या कवींनी मराठीला कवितांच्या माध्यमातून श्रीमंती प्राप्त करून दिली. तसेच द. मा. मिरासदार, शंकरराव खरात, वि. स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे, दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड आणि शरणकुमार लिंबाळे यांनी ग्रामीण व दलित साहित्यातून मराठीची पताका फडकवली.
क्रांतीची भाषा मराठी
मराठीची भुरळ केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर जगाला पडली. फादर दिब्रिटो, महात्मा गांधी, भगतसिंह, सुखदेव, रवींद्रनाथ टागोर या महापुरुषांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे शस्त्र मराठी वृत्तपत्रेच होती. मराठी हिमालयासारखी उत्तुंग आणि धिरोदत्त आहे.
आजचे वास्तव आणि चिंतन
दुर्दैवाने, आज मराठीला काहीशी अवकळा प्राप्त होताना दिसत आहे. इंग्रजी बोलणे म्हणजे 'आधुनिक' आणि मराठी बोलणे म्हणजे 'कमीपणा' असे मानले जात आहे. पण ही वैचारिक गरिबी आपण झटकली पाहिजे. इंग्रजी ही जगाची खिडकी आहे, ती शिकलीच पाहिजे; पण आपली मातृभाषा मराठी आपल्या हृदयावर कोरलेली असावी.
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपण संकल्प करूया की, आपली ही वैश्विक मराठी अधिक समृद्ध करू. कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
अभिमान आहे मला मी 'मराठी' असल्याचा आणि गर्व आहे मी 'महाराष्ट्रीयन' असल्याचा!
जय महाराष्ट्र!
लेखक संपर्क:
पंकज राजेंद्र कासार काटकर
मु.पो. काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
भ्रमणध्वनी: ९७६४५६१८८१
'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!
0 Comments