"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
"संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आपल्याला हा महाराष्ट्र प्राप्त झाला आहे. या थोर महात्म्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी प्रगतीपथावर वाटचाल करावी," असे प्रतिपादन सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे यांनी केले. तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मसुते होते. यावेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब जगताप, संस्थेचे अध्यक्ष बसवनाप्पा मसुते, संचालक महेशकुमार जगताप, प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शानदार ध्वजारोहण व प्रतिमा पूजन
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. संस्थेचे संचालक महेशकुमार जगताप यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य ध्वजारोहण ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मसुते यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता.
कामगारांच्या हक्कांचा गौरव
महाराष्ट्र दिनासोबतच कामगार दिनाचे महत्त्वही यावेळी विषद करण्यात आले. प्राचार्य वडणे यांनी कामगारांना मिळालेले हक्क, कायदेशीर सुविधा आणि त्यांचे समाजातील योगदान यावर मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी भविष्यातील शिक्षणाची दिशा कशी ठरवावी, यावरही त्यांनी मोलाचा सल्ला दिला.
विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
कुंभार सर : आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.
बटलवाड सर : संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कामगार दिनामागची जागतिक पार्श्वभूमी यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य सुहास वडणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक कुंभार सर यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments