"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | प्रतिनिधी
संसाराचा गाडा हाकत असतानाच आपल्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या महिलांच्या सुरांनी धाराशिव नगरी दुमदुमून गेली. निमित्त होते शहरात आयोजित भव्य महिला भजनी मंडळ स्पर्धेचे. 'धाराशिव मित्र मंडळ' आणि 'नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४ हून अधिक भजनी मंडळांनी सहभाग नोंदवत आपल्या भक्तीरसाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
२४ मंडळांची चुरस, ७ मानकरी
या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक अभंग, गवळणी आणि भजनांचे सादरीकरण केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत बँक कॉलनीतील रुक्मिणी महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदावर नाव कोरले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत ७ स्पर्धक निवडण्यात आले यामध्ये
प्रथम क्रमांक: रुक्मिणी महिला भजनी मंडळ, बँक कॉलनी,
द्वितीय क्रमांक: जनाई महिला भजनी मंडळ, शांतिनिकेतन कॉलनी,
तृतीय क्रमांक: लक्ष्मी नारायण महिला भजनी मंडळ, सहयोग कॉलनी
चौथा क्रमांक: ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ, गणेश नगर
पाचवा क्रमांक: पांडुरंग महिला भजनी मंडळ, गणेश नगर
सहावा क्रमांक: रुक्मिणी महिला भजनी मंडळ, एस.टी. कॉलनी
सातवा क्रमांक: जिजाऊ महिला भजनी मंडळ, जिजाऊ नगर
मान्यवरांच्या हस्ते गौरव
विजेत्या मंडळांना भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगरसेविका गायत्री दंडनाईक आणि आकांक्षा वाघमारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मान्यवरांनी महिलांच्या सुप्त गुणांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे अध्यात्म आणि संस्कृती जोपासली जात असल्याचे मत व्यक्त केले.
तज्ज्ञ परीक्षकांकडून पारख
स्पर्धेचे परीक्षण ह.भ.प. भारत महाराज कोकाटे, ह.भ.प. योगेश बाप्पा इंगळे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज जगताप, ह.भ.प. मधुकर महाराज निंबाळकर आणि ह.भ.प. पांडुरंग गरड महाराज या अनुभवी कीर्तनकार व अभ्यासकांनी केले. गायन, वादन आणि सादरीकरण या निकषांवर विजेत्यांची निवड करण्यात आली.
आयोजकांचे परिश्रम
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीचे श्रीराम खामकर, अशोक गायकवाड, अशोक ढोबळ, संजय शिंदे, राजू तांबे, प्रदीप तांबे, विभीषण मोरे, गोविंद कोळगे, नवनाथ काळे, हणमंत भालेकर, दशरथ थोरात, रमेश भोसले आणि अर्जुन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेने धाराशिवकरांना एक आध्यात्मिक मेजवानीच दिली.
0 Comments