Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जिद्द आणि चिकाटीला कष्टाची झालर; शेतमजुराच्या लेकाने मारली एमपीएससीत बाजी! केमवाडीचा सोहेल शेख आता 'अन्न व नागरी पुरवठा अधिकारी'; अठराविश्व दारिद्र्यावर मात करत मिळवले यश

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
परिस्थिती कितीही बेताची असली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सोहेल शकील शेख याने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत सोहेलने घवघवीत यश संपादन करत 'सहाय्यक अन्न व नागरी पुरवठा अधिकारी' पदाला गवसणी घातली आहे. एका शेतमजुराच्या मुलाने मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण जिल्ह्यासह सीमाभागात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दारिद्र्याशी दोन हात करत शिक्षणाची ओढ
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले केमवाडी हे एक छोटेसे खेडे. सोहेलच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील शकील शेख आणि आई शहराबानू हे दोघेही दिवसभर दुसऱ्याच्या शेतात घाम गाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोहेलचा धाकटा भाऊ साहिल हा देखील शेतात कांद्याची पोती भरण्यापासून ते मिळेल ती मजुरीची कामे करून भावाच्या शिक्षणाला हातभार लावतो. घरात अठराविश्व दारिद्र्य असतानाही, सोहेलने आपले लक्ष कधीही ढळू दिले नाही. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयातून त्याने बीबीए (BBA) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

आई-वडिलांच्या कष्टाचे चीज
उन्हातान्हात शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे कष्ट सोहेलने जवळून पाहिले होते. हेच कष्ट त्याच्या यशाची प्रेरणा ठरले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या, मात्र जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने सप्टेंबर २०२५ मध्ये मुख्य परीक्षा दिली. ३० एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालात सोहेलचे नाव झळकले आणि केमवाडीत आनंदाला उधाण आले. त्याने २८१.५० गुणांसह ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातून यश मिळवत प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

गावात जल्लोष आणि कौतुकाचा वर्षाव
सोहेलच्या या यशाची बातमी समजताच केमवाडी ग्रामस्थांनी जल्लोष केला. गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. "माझ्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिकवले, त्यांच्या कष्टाचे आज चीज झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द हारू नये, मेहनत केल्यास यश नक्कीच मिळते," अशी भावना सोहेलने यावेळी व्यक्त केली.

सोहेल शेखच्या या यशामुळे केवळ शेख कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुण आता शासकीय खुर्चीवर बसून जनसेवा करणार असल्याने परिसरातून त्याचे विशेष अभिनंदन होत आहे.

✍️Only न्युज धाराशिव— खरी बातमी, वेगवान गती

Post a Comment

0 Comments