काटी | उमाजी गायकवाड
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 'एनएमएमएस' (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरदरवाडी येथील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण ८ विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात शाळेचे कौतुक होत आहे.
या परीक्षेत वैभवी महादेव गायकवाड, प्रणिती राम मते, सरस्वती दादाराव साळुंके, संचिता सचिन मते, वैभवी अशोक कदम, राजनंदिनी दादाराव मोरे, कल्याणी मल्हारी क्षीरसागर आणि सोहम सहदेव कदम या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांना आता केंद्र सरकारकडून माध्यमिक शिक्षणासाठी दरमहा निश्चित केलेली शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती भावना चौधरी, श्री. सहदेव माळी आणि श्री. विशाल जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कोळी व शालेय व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे पांगरदरवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
🥀सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर यश
--सहशिक्षिका भावना चौधरी
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असते, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुले ही राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे."
— श्रीमती भावना चौधरी (मार्गदर्शक शिक्षिका)
✍️Only न्युज धाराशिव -थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!
0 Comments